नवी मुंबई: भुयार खोदून बँकेवर दरोडा , पाच महिन्यांपासून सुरू होते भुयार खोदण्याचे काम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 14, 2017 03:31 AM2017-11-14T03:31:51+5:302017-11-14T03:35:15+5:30
हिंदी चित्रपटातील रहस्यमय कथेलाही लाजवणारा दरोडा जुईनगर येथील बँक आॅफ बडोदावर घातल्याचे सोमवारी उघड झाले. बँकेशेजारच्या दुकानातून सुमारे ३० फूट भूयार खोदून थेट लॉकर रूममध्ये प्रवेश करून चोरट्यांनी
नवी मुंबई : हिंदी चित्रपटातील रहस्यमय कथेलाही लाजवणारा दरोडा जुईनगर येथील बँक आॅफ बडोदावर घातल्याचे सोमवारी उघड झाले. बँकेशेजारच्या दुकानातून सुमारे ३० फूट भूयार खोदून थेट लॉकर रूममध्ये प्रवेश करून चोरट्यांनी २२५ पैकी ३० लॉकर फोडून दागिन्यांसह कोट्यवधी रुपयांच्या मौल्यवान ऐवजाची लूट केली. बँकेशेजारचे हे दुकान भाड्याने दिलेले असून तेथील सर्व जण फरार झाले आहेत. झारखंडमधील ही टोळी असल्याचा संशय आहे.
जुईनगर सेक्टर ११ येथील बँक आॅफ बडोदाची शाखा शनिवार, रविवारच्या दोन दिवसांच्या सुटीनंतर सोमवारी सकाळी उघडली. बँकेच्या खातेधारक रूपाली अडागळे या लॉकर वापरण्यासाठी बँकेत आल्या होत्या. या वेळी बँक कर्मचाºयांना सुरुवातीचा काही वेळ लॉकर रूमचा दरवाजा उघडण्यात अडथळा येत होता. त्यानंतर दरवाजा उघडला तेव्हा बँकेच्या लॉकर रूममध्ये मोठा दरोडा पडल्याचे दिसून आले. घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी केलेल्या पाहणीत भुयार खोदून बँकेवर दरोडा पडल्याचे दिसून आले.
‘भक्ती रेसिडेन्सी’ या इमारतीच्या तळाशी चार गाळ्यांमध्ये बँक आहे. त्यापैकी एक गाळा एटीएमच्या वापरासाठी आहे. त्यापासून तिसºया क्रमांकाच्या गाळ्यामधून हे ३० फूट लांब व तीन फूट रुंदीचे भुयार खोदण्यात आले. लॉकर रूमखाली ते पाच फूट खोल होते. या खोदकामातून निघालेल्या मातीचीदेखील त्यांनी परिसराबाहेर विल्हेवाट लावलेली आहे. ते दुकान शरद कोठावळे यांचे असून गेना प्रसाद नावाच्या व्यक्तीला भाड्याने दिले होते. पाच महिन्यांपासून त्या ठिकाणी बँकेवर दरोड्यासाठी भुयार खोदण्याचे काम सुरू होते, अशी शक्यता वर्तवली जात आहे.
बँकेत सुमारे २२५ लॉकर असून, त्यापैकी ३0 लॉकर फोडण्यात आले आहेत. दरोड्यात बँक ग्राहकांचा कोट्यवधींचा ऐवज लुटला गेल्याची शक्यता आहे.
दरोडेखोरांनी बँकेतील ३० लॉकर फोडले असून, त्यापैकी ८ ते १० ग्राहकांच्या मुद्देमालाची माहिती पोलिसांना मिळू शकलेली आहे. त्यापैकी प्रवीण ठाकूर यांच्या लॉकरमध्ये कुटुंबाचे ३० तोळ्यांहून अधिक सोन्याचे दागिने होते.
पाच महिन्यांपासून भुयार खोदण्याचे काम!
पाच महिन्यांपासून भुयार खोदण्याचे काम सुरू होते, अशी शक्यता आहे. हे दुकान बंदच असायचे. तेथे एक किंवा दोन तरुण असायचे. भक्ती रेसिडेन्सीमधील रहिवाशांना दुकानातील मालावर कायम मातीची धूळ दिसायची. ही धूळ भुयारातील मातीची असल्याचे उघड झाले आहे.
भुयारात टेकू-
भुयार खचू नये यासाठी त्यात बांबूचे टेकू लावून त्यावर प्लाय लावले होते. दरोडेखोरांनी पद्धतशीर ‘रेकी’ करून थेट लॉकर रूममध्येच पोहोचणारे भुयार तयार केल्याचे पोलिसांनी सांगितले.
झारखंडची टोळी?
भुयार खोदून अथवा भिंतीला भगदाड पाडून दरोडा टाकण्यात झारखंड परिसरातील सराईत टोळ्या सक्रिय आहेत. बडोदा बँकेवरही अशाच टोळीने दरोडा टाकल्याची शक्यता आहे. तपासात महत्त्वाचा धागा ठरतील अशा काही बाबी पोलिसांच्या हाती लागल्या आहेत. त्यानुसार लवकरच या गुन्ह्याचा उलगडा होण्याची शक्यता आहे.
- डॉ. सुधाकर पठारे,
परिमंडळ उपआयुक्त