नवी मुंबई-‘गेट वे’ प्रकल्प दोन वर्षांत
By admin | Published: July 27, 2016 02:31 AM2016-07-27T02:31:47+5:302016-07-27T02:31:47+5:30
वाहतूक आणि पर्यावरणावरील ताण कमी करण्याकरीता जलवाहतुकीला प्राधान्य देण्याची राज्य सरकारची योजना असून नवी मुंबई ते गेट वे आॅफ इंडिया हा जलवाहतूक प्रकल्प
मुंबई : वाहतूक आणि पर्यावरणावरील ताण कमी करण्याकरीता जलवाहतुकीला प्राधान्य देण्याची राज्य सरकारची योजना असून नवी मुंबई ते गेट वे आॅफ इंडिया हा जलवाहतूक प्रकल्प मार्च २०१८ पर्यंत पूर्ण करण्यात येईल,
अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी विधानसभेत केली.
संदीप नाईक, पांडुरंग बरोरा, जितेंद्र आव्हाड यांच्या प्रश्नात मुख्यमंत्री म्हणाले की नवी मुंबई ते गेट वे आॅफ इंडिया जलवाहतुकीचा मार्ग तयार करण्यासाठी साधारणपणे १८ महिन्यांचा कालावधी लागणार आहे. असे असले तरी या मार्गावरील सर्व सुरक्षा तपासून साधारणपणे मार्च २०१८ पर्यंत काम पूर्ण होणे अपेक्षित आहे. त्यामुळे येत्या दोन वर्षात या मार्गावरील जलवाहतूक सुरू होईल. नवीन भाऊचा धक्का (मुंबई) ते नेरु ळ, नवी मुंबई अशी जलवाहतूक व्यवस्था तयार करण्यात येत आहे. पूर्व किनारपट्टीवरील जलवाहतूक सुरू करण्यासाठी नवीन भाऊचा धक्का येथे मुंबई बंदर विश्वस्त मंडळ, केंद्र शासन, तसेच नेरु ळ- नवी मुंबई येथे सिडको आणि अलिबागच्या मांडवा येथे महाराष्ट्र मेरीटाईम बोर्डामाफत जलप्रवासी टर्मिनलची उभारणी करण्यात येत आहे.
मांडवा येथे करावयाच्या जलप्रवासी प्रकल्प टर्मिनलच्या कामाची निविदा निश्चित करण्यात आली असून याचे काम लवकरच सुरू होणार आहे, असेही मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले. तत्पूर्वी, बंदरे विकास राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांनी सांगितले की, जलवाहतुकीच्या अंतर्गत भाऊचा धक्का येथील ११० कोटीचे काम पोर्ट ट्रस्टच्या माध्यमातून होणार असून त्याची निविदा प्रक्रिया पूर्ण झाली आहे. धक्क्यावर लाट अडविण्यासाठी १३५ कोटींचे काम असून त्याची निविदा प्रक्रिया पूर्ण होत आली आहे. बांद्रा ते दहिसर मार्गावर जलवाहतूक सुरु करण्याच्या सूचनेचा विचार केला जाईल. त्यासाठी सल्लागार नेमून त्यांच्याकडून अहवाल आल्यानंतर मग त्याबाबत निर्णय घेतला जाईल. (विशेष प्रतिनिधी)
नवी मुंंबई विमानतळाच्या अडचणी व अडथळे असून कधी दूर करणार अशी विचारणा पतंगराव कदम यांनी केली, तेव्हा या विमानतळासाठी शासकीय अडथळे नाहीत, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.