नवी मुंबई पोलिसांची वेबसाईट पुन्हा हॅक
By admin | Published: July 15, 2017 04:21 AM2017-07-15T04:21:55+5:302017-07-15T04:21:55+5:30
नवी मुंबई पोलिसांचे संकेतस्थळ महिन्यात दुसऱ्यांदा हॅक झाले आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नवी मुंबई : नवी मुंबई पोलिसांचे संकेतस्थळ महिन्यात दुसऱ्यांदा हॅक झाले आहे. तुर्की येथील हॅकर्सने ही वेबसाईट हॅक केली असून त्यावर तुर्की भाषेत संदेश प्रसारित केला आहे. या प्रकारानंतर खडबडून जागे झालेल्या नवी मुंबई पोलिसांपुढे तुर्कीच्या हॅकर्सचे आव्हान निर्माण झाले आहे.
जेएनपीटी येथील संगणकांवर झालेल्या सायबर हल्ल्यानंतर नवी मुंबई पोलिसांच्या संकेतस्थळावर सायबर हल्ले होऊ लागले आहेत. त्यामुळे दोन्ही गुन्ह्यातील हॅकर्स एकच असावेत अशी शक्यता निर्माण झाली आहे. नवी मुंबई पोलिसांचे संकेतस्थळ १ जुलै रोजी सकाळी ७.३० वाजण्याच्या सुमारास प्रथम हॅक झाले होते. मात्र ही बाब निदर्शनास येताच पोलिसांनी वेबसाईट हॅकर्सच्या ताब्यातून मुक्त केली होती. यानंतर त्यातील डेटा सुरक्षित असून संकेतस्थळ पूर्वीपेक्षा अधिक सुरक्षित केल्याचा दावा केला होता. परंतु यानंतर अवघ्या १४ दिवसांत पुन्हा नवी मुंबई पोलिसांचे संकेतस्थळ हॅक करून हॅकर्सनी पोलिसांच्या तंत्रज्ञानापुढे आव्हान निर्माण केले आहे. शुक्रवारी रात्री ८.४० वाजण्याच्या सुमारास प्रथम वेबसाईट हॅक झाल्याचे निदर्शनास आले. त्यावर तुर्कीचा झेंडा झळकवून तुर्की भाषेत संदेश प्रसारित करण्यात आला आहे. या प्रकारानंतर नवी मुंबई पोलीस खडबडून जागे झाले आहेत. दोन दिवसांपूर्वीच नवी मुंबई सायबर शाखेने जीओचा डेटा चोरणाऱ्या हॅकर्सला जयपूर येथून अटक केली आहे. यावरून सायबर सेलच्या कार्याचे कौतुक होत असतानाच त्यांच्यापुढे तुर्कीचे हॅकर्स डोकेदुखी ठरू लागले आहेत.