नवी मुंबईकरांनी आठवडाभरात भरला २९ कोटी ७२ लाखांचा कर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 19, 2016 02:52 AM2016-11-19T02:52:27+5:302016-11-19T02:52:27+5:30
महापालिकेचे विविध कर भरण्यासाठी जुन्या व्यवहारातून रद्द झालेल्या नोटा स्वीकारल्या जात आहेत.
नवी मुंबई : महापालिकेचे विविध कर भरण्यासाठी जुन्या व्यवहारातून रद्द झालेल्या नोटा स्वीकारल्या जात आहेत. सुरुवातीला ११ नोव्हेंबर रोजी मध्यरात्रीपर्यंत नागरिकांना कर भरण्यासाठी जुन्या नोटांचा वापर करता येणार होता. मात्र, त्यानंतर ही मुदत वाढवून गुरुवारी २४ नोव्हेंबरपर्यंत कर भरता येणार आहे. ८ नोव्हेंबरपासून ते या बुधवारपर्यंत नवी मुंबई महानगरपालिकडे २९ कोटी ७२ लाख रुपये जमा झाले आहेत.
जुन्या चलनातील ५०० व १००० रुपयांच्या नोटांच्या स्वरूपात महानगरपालिका यांचा विविध कर, थकबाकी भरणा येणार आहे. महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या मार्गदर्शनाखाली महापालिकेची सर्व करभरणा कार्यालये ११ नोव्हेंबर रोजी मध्यरात्रीदेखील सुरू होती.
नागरिकांनी या संधीचा फायदा घेत १३.५ कोटी इतकी रक्कम महापालिकेत धनादेश स्वरूपात जमा केली. पनवेल महानगरपालिकेत १६ नोव्हेंबरपर्यंत ४ कोटी ३० लाख रुपयांची रक्कम जमा झाली आहे. जुन्या चलनातील नोटा गुरुवारपर्यंत स्वीकारल्या जाणार असून नागरिकांनी या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन महानगरपालिकेने केले आहे. (प्रतिनिधी)