नवी मुंबई लवकरच होणार सिडकोमुक्त
By admin | Published: March 21, 2017 03:36 AM2017-03-21T03:36:35+5:302017-03-21T03:36:35+5:30
औरंगाबादच्या धर्तीवर नवी मुंबईही लवकरच सिडकोमुक्त होणार आहे.
नवी मुंबई : औरंगाबादच्या धर्तीवर नवी मुंबईही लवकरच सिडकोमुक्त होणार आहे. शहरातील संपादित जमिनी फ्री होल्ड करण्याच्या दृष्टीने सिडकोने कार्यवाही सुरू केली आहे. यासंदर्भातील अंतिम मसुदा तयार करण्याचे काम हाती घेण्यात
आले आहे. पुढील दोन महिन्यांत मसुदा तयार करून अंतिम मंजुरीसाठी राज्य सरकारकडे पाठविण्यात येणार आहे.
शहराच्या उभारणीसाठी राज्य सरकारने सिडकोच्या माध्यमातून येथील जमिनी संपादित केल्या आहेत. त्या विविध वापरासाठी साठ वर्षांच्या लिजवर दिल्या आहेत. पुढील काही वर्षात यातील अनेक भूखंडांचा लिज करार संपुष्टात येईल. त्यानंतर काय, असा प्रश्न रहिवाशांना सतावत आहे. जमिनी भाडेपट्ट्यावर असल्याने त्यावरील मालमत्ता हस्तांतरणासाठी रहिवाशांना सिडकोवर अवलंबून राहावे लागते. त्यामुळे सिडकोने नवी मुंबईतील जमिनी फ्रीहोल्ड कराव्यात, अशी मागणी गेल्या काही वर्षांपासून होत आहे. बेलापूरच्या आ. मंदा म्हात्रे विविध स्तरावर त्याचा पाठपुरावा करीत आहेत. विधानसभेतही त्यांनी अनेकदा हा प्रश्न उपस्थित करून चर्चा घडवून आणली. त्याची दखल घेत सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक भूषण गगराणी यांनी सोमवारी शहरातील विविध गृहनिर्माण सोसायट्यांच्या पदाधिकाऱ्यांची बैठक बोलाविली होती. यावेळी आ. म्हात्रे यांच्यासह गृहनिर्माण सोसायट्यांचे जवळपास सातशे पदाधिकारी उपस्थित होते.
विविध शैक्षणिक, सामाजिक संस्थांना सिडकोने भाडेकराराने भूखंड दिलेत. प्रकल्पग्रस्तांना साडेबारा टक्के योजनेअंतर्गत भूखंड वाटप केले आहे. परंतु कायदेशीरदृष्ट्या त्याची मालकी सिडकोकडे आहे. त्यामुळे सिडकोने संपादित जमिनी फ्री होल्ड कराव्यात, अशी मागणी आ. म्हात्रे यांनी बैठकीत केली.
तर जमिनी फ्री होल्ड करण्यासंदर्भातील मसुदा दोन महिन्यांत तयार करून राज्य सरकारकडे पुढील कार्यवाहीसाठी पाठविला जाईल, अशी ग्वाही यावेळी गगराणी यांनी दिली. त्यामुळे नवी मुंबई लवकरच सिडकोमुक्त होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. सोमवारी आयोजित या बैठकीला सिडकोचे सह व्यवस्थापकीय संचालक राजेंद्र चव्हाण, मालमत्ता विभागाचे व्यवस्थापक फय्याज खान उपस्थित होते. (प्रतिनिधी)