नवी मुंबईकरांनी केला स्वच्छ शहराचा निर्धार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 3, 2016 02:55 AM2016-10-03T02:55:56+5:302016-10-03T02:55:56+5:30
गांधी यांच्या १४७ व्या जयंतीनिमित्त आयोजित स्वच्छ भारत मिशनच्या दुसऱ्या वर्धापन दिनानिमित्त शहरात स्वच्छतेविषयी जनजागृती करण्यात आली.
नवी मुंबई : राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या १४७ व्या जयंतीनिमित्त आयोजित स्वच्छ भारत मिशनच्या दुसऱ्या वर्धापन दिनानिमित्त शहरात स्वच्छतेविषयी जनजागृती करण्यात आली. महानगरपालिका, शाळा, महाविद्यालये, सामाजिक संस्था, राजकीय पक्ष यांच्या वतीने रविवारी स्वच्छता मोहीम, जनजागृती रॅली तसेच सामाजिक उपक्रम राबविण्यात आले. यावेळी स्वच्छ आणि हागणदारीमुक्त शहराचा निर्धार करण्यात आला.
नागरिकांनी तसेच विद्यार्थ्यांनी श्रमदान करून स्वच्छ, सुंदर व हागणदारीमुक्त शहराबाबत जनजागृती केली. महापौर सुधाकर सोनावणे यांनी आंबेडकरनगर, राबाडे येथील स्वच्छता मोहिमेत सहभागी होऊन नागरिकांनी कमीत कमी कचरा निर्माण करून उघड्यावर कचरा टाकणार नाही अशी सवय लावून घेण्याचे आवाहन केले. उपमहापौर अविनाश लाड यांनीही वाशी येथील मिनी सी शोअर परिसरातील मोहिमेप्रसंगी ओला व सुका कचरा वेगवेगळा करण्याचे व शहर स्वच्छतेत संपूर्ण योगदान देण्याचे आवाहन नागरिकांना केले. बेलापूर विभागात किल्ले गावठाण, गोवर्धनी माता मंदिर परिसर, नेरु ळ विभागात सेक्टर ३, बस डेपो, वाशी विभागात मिनी सी शोअर परिसर, तुर्भे विभागात ए.पी.एम.सी. मार्केट सेक्टर १९ परिसर, घणसोली विभागात मुंब्रादेवी निब्बाण टेकडी परिसर, त्याचप्रमाणे कोपरखैरणे विभागात कोपरखैरणे रेल्वे स्टेशन परिसर, ऐरोली विभागात सेक्टर ३ बसडेपो, ऐरोली रेल्वे स्टेशन आणि भाजी मार्केट याठिकाणी व दिघा विभागात हिंदमाता शाळेजवळ, विष्णुनगर बौध्द शाखेजवळ, मुकुंद कंपनी गेटजवळ विशेष स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. शहरातील सर्वच विभागात स्वच्छतेची सामूहिक शपथ ग्रहण करण्यात आली, तसेच शहर स्वच्छ राखण्याचा निर्धार करण्यात आला.
या मोहिमेला अतिरिक्त आयुक्त अंकुश चव्हाण व रमेश चव्हाण, परिमंडळ १ चे उपआयुक्त दादासाहेब चाबुकस्वार व परिमंडळ २ चे उपआयुक्त अंबरीश पटनिगीरे, घनकचरा व्यवस्थापन उपआयुक्त तुषार पवार, स्वच्छ महाराष्ट्र अभियान उपआयुक्त रिता मैत्रेवार यांची उपस्थिती होती. (प्रतिनिधी)
>सीबीडीतील सार्वजनिक नवरात्रौत्सव मंडळ सेक्टर ८ए व बी यांच्या वतीने तसेच स्वीकृत नगरसेवक साबू डॅनियल यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. बॉम्बे कॅथलिक सभेच्या वतीने वाशी येथे जनजागृती रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. या रॅलीच्या माध्यमातून स्वच्छतेचा संदेश देण्यात आला. वाशीतील फादर एग्नेल स्कूलच्या विद्यार्थ्यांनी या रॅलीत सहभागी होवून शहर स्वच्छ आणि सुंदर ठेवण्याचा संकल्प केला.
>नेरूळ येथील दिल्ली पब्लिक स्कूलच्या वतीने महात्मा गांधी जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी शाळेतील विद्यार्थ्यांनी गांधीजींची आवडती भजने सादर केली. गांधीजींची शिकवण, त्यांचे विचार याबाबत शाळेच्या शिक्षकांनी विद्यार्थ्यांना सखोल माहिती दिली.