नवी मुंबईकरांची जलपर्यटनाला पसंती
By admin | Published: May 19, 2016 03:09 AM2016-05-19T03:09:31+5:302016-05-19T03:09:31+5:30
उन्हाळी सुट्यांमध्ये बच्चेकंपनीबरोबरच थोरामोठ्यांनाही पर्यटनाचे आकर्षण वाटते.
नवी मुंबई : उन्हाळी सुट्यांमध्ये बच्चेकंपनीबरोबरच थोरामोठ्यांनाही पर्यटनाचे आकर्षण वाटते. वाशी मिनी सी शोअर येथे जलपर्यटन सुरू झाले असून, नवी मुंबईतील नागरिकांचा भरपूर प्रतिसाद मिळत आहे. हिंदजल प्रवासी वाहतूक सरकारी संस्थेच्या वतीने जानेवारीमध्य सुरू केलेल्या बेलापूर ते एलिफंटा फेरीबोट सेवेलाही पर्यटकांची गर्दी पाहता, नवी मुंबईकरांचा जलपर्यटनाकडे असलेला कल दिसून येतो.
नवी मुंबईच्या सौंदर्यात भर घालणाऱ्या वाशी मिनी सी शोअरला भेट देणाऱ्या नागरिकांची संख्या दिवसेंदिवस वाढ आहे. त्या परिसरातील उद्यानांमध्येही बच्चेकंपनीनी मोठ्या प्रमाणात गर्दी केल्याचे पाहायला मिळते. काहीच दिवसांपूर्वी येथे बोटिंग सेवा सुरू करण्यात आली असून, या जलपर्यटनालाही मोठ्या प्रमाणात वाव मिळत आहे. संध्याकाळच्या वेळी या ठिकाणी तरुणवर्गाबरोबरच ज्येष्ठ नागरिकही मोठ्या संख्येने भेट देत असून, जलपर्यटनाचा मनमुराद आस्वाद घेताना पाहायला मिळतात. ५० रुपयांपासून ते २०० रुपयांपर्यंत दर आकारले जात असून, तासभराची सैर करण्यासाठी या ठिकाणी मोठ्या प्रमाणात सर्वच वयोगटांतील नागरिकांनी गर्दी केली आहे. आजूबाजूच्या परिसरात राहणारे नागरिकही मिनी सी शोअर परिसरात मॉर्निंग वॉकसाठी येत असून, संध्याकाळी त्याहीपेक्षा अधिक गर्दी पाहायला मिळते.