नवी मुंबईवर नाईकांचाच झेंडा
By admin | Published: April 24, 2015 02:21 AM2015-04-24T02:21:09+5:302015-04-24T02:21:09+5:30
संपूर्ण राज्याचे लक्ष लागून राहिलेल्या नवी मुंबई महापालिकेवर माजी मंत्री गणेश नाईक यांचेच राज्य असल्याचे पुन्हा एकदा सिद्ध झाले.
नवी मुंबई : संपूर्ण राज्याचे लक्ष लागून राहिलेल्या नवी मुंबई महापालिकेवर माजी मंत्री गणेश नाईक यांचेच राज्य असल्याचे पुन्हा एकदा सिद्ध झाले. नाईकांच्या नेतृत्वाखाली लढवल्या गेलेल्या या निवडणुकीत राष्ट्रवादीने १११पैकी ५२ जागा जिंकून अपक्षांच्या मदतीने सत्तासोपानाचा मार्ग सोपा केला. सत्तासोपान गाठण्यासाठी नाईकांनी काँगे्रससमोर आघाडीचा प्रस्ताव ठेवला आहे. दुसरीकडे बंडखोरांना गृहीत न धरणे शिवसेना-भाजपा युतीला महागात पडले आणि नाईकांची सत्ता घालवण्याचे स्वप्न अखेर स्वप्नच राहिले.
निवडणुकीत ६८ जागा लढणाऱ्या शिवसेनेस ३८ तर ४३ जागा लढणाऱ्या भाजपास अवघ्या ६ जागांवर समाधान मानावे लागले. काँगे्रस १० जागा जिंकून तिसऱ्या स्थानावर राहिली. अपक्षांनी
५ जागा जिंकल्या आहेत. यात राष्ट्रवादी पुरस्कृत सुधाकर सोनवणे आणि रंजना सोनवणे हे दाम्पत्य, कोपरखैरणेतील सायली नारायण शिंदे आणि श्रद्धा गवस हे राष्ट्रवादी बंडखोर आणि शिवसेना बंडखोर सीमा गायकवाड यांचा समावेश आहे. शिवसेना नेत्यांनी बंडखोरांना गृहीत न धरल्याने त्यांना सत्तेपासून दूर राहावे लागले.