मुंबईच्या ट्रॅफिकजामवर जलवाहतुकीचा तोडगा
By admin | Published: August 10, 2016 04:41 AM2016-08-10T04:41:35+5:302016-08-10T04:41:35+5:30
भारतीय देशांतर्गत जलमार्ग प्राधिकरण (आयडब्ल्यूएआय) लवकरच हवाई वाहतूक नियंत्रित करणाऱ्या एअर ट्रॅफिक कंट्रोलप्रमाणे (एटीसी) काम करताना दिसेल.
नितीन अग्रवाल, नवी दिल्ली
भारतीय देशांतर्गत जलमार्ग प्राधिकरण (आयडब्ल्यूएआय) लवकरच हवाई वाहतूक नियंत्रित करणाऱ्या एअर ट्रॅफिक कंट्रोलप्रमाणे (एटीसी) काम करताना दिसेल. मुंबईची वाहतूक समस्या सोडविण्यासाठी जलमार्गे प्रवासी वाहतूक सुरू करण्याच्या कामाला गती देण्यात आली असल्याचे केंद्रीय वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांनी मंगळवारी राज्यसभेत सांगितले.
मुंबईच्या सी फ्रंटवर सहा मजली टर्मिनल उभारण्यात येत आहे. मांडवाजवळ समुद्रात दोन धक्के बांधण्याचे आदेश देण्यात आले असून, डिमेलो रोडवर उंच पूल उभारणीचे काम सुरू आहे. महाराष्ट्र सागरी मंडळाच्या सहकार्याने हे काम सुरू आहे, असेही गडकरी म्हणाले. मुंबई-ठाणे जलमार्ग विकसित करण्यासाठी अनेक मागण्या मंजूर करण्यासह ठाण्याला ३०० कोटी रुपयेही देण्यात आले आहेत, असे गडकरी म्हणाले.
मजीद मेमन यांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना त्यांनी सांगितले की, भारतीय देशांतर्गत जलमार्ग प्राधिकरण आणि मेसर्स मारुती सुझुकी इंडिया लि. यांच्यात कारचे ताफे राष्ट्रीय जलमार्ग क्रमांक एकवर वाराणसीहून कोलकाता येथे पाठविण्याबाबत करार झाला आहे. १२ आॅगस्ट रोजी याला प्रारंभ होईल आणि नंतर ही वाहतूक पूर्वोत्तरपर्यंत विस्तारित करण्यात येणार आहे. रेल्वेचे प्रतिटन भाडे १.४१ रुपये, रस्ता मार्गावरील मालवाहतुकीचे भाडे २.५८ रुपये प्रतिटन आहे.
तथापि, जलमार्गे वाहतुकीचा प्रतिटन केवळ १.०६ रुपये खर्च येतो. याशिवाय एक लिटर इंधनाद्वारे एक टन माल रस्तामार्गे २४ कि.मी.पर्यंत, रेल्वेद्वारे ९५ कि.मी., तर जलमार्गे २१५ कि.मी.पर्यंत पोहोचवता येतो, असे ते म्हणाले. देशात असे १११ जलमार्ग विकसित करण्यात आले असून, यात १६२० कि. मी.च्या गंगा जलमार्गाचा समावेश आहे, असे गडकरी
यांनी संसदेच्या वरिष्ठ सभागृहात सांगितले.
जल वाहतुकीसाठी पाच मल्टीमॉडल हब आणि २० वॉटर पोर्टस् बनविण्यात येत असून, ४००० कोटी रुपयांचा हा प्रकल्प २०१८ पर्यंत पूर्ण करण्यात येईल, असे त्यांनी सांगितले.