नवज्योतसिंग सिद्धू यांनी आळवला उपेक्षेचा राग
By admin | Published: March 4, 2016 02:59 AM2016-03-04T02:59:18+5:302016-03-04T02:59:18+5:30
भाजपाचे माजी खासदार व माजी कसोटी क्रिकेटपटू नवज्योतसिंग सिद्धू यांनी पक्षावरील नाराजी पुन्हा व्यक्त केली आहे.
सरकारचे युवकांकडे दुर्लक्ष : माझा उपयोग केला नाही!
मुंबई : भाजपाचे माजी खासदार व माजी कसोटी क्रिकेटपटू नवज्योतसिंग सिद्धू यांनी पक्षावरील नाराजी पुन्हा व्यक्त केली आहे. पक्ष माझ्याकडे दुर्लक्ष करीत असून देशातील तरुणांची सेवा करण्याची संधी पक्षनेतृत्वाने मला द्यावी, अशी भावना त्यांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केली.
पक्षाला व देशाला द्यावे असे माझ्याकडे बरेच काही होते; परंतु पक्ष तशा स्वरूपाच्या जबाबदाऱ्या देत नसल्यामुळे मी बाजूला फेकलो गेलो आहे. मी दरवर्षी २० कोटी रुपये कमावत होतो; परंतु सक्रिय राजकारणात काम करण्यासाठी ते करिअर मी सोडून दिले. त्यासाठी पतियाळाहून चंदिगडला स्थलांतर केले व तेथे पक्षासाठी जनमत तयार केले. त्यामुळे अमृतसरमधून लोकसभेवर २००४, २००७ (पोटनिवडणूक) आणि २००९ मध्ये निवडून गेलो. परंतु गत निवडणुकीत पक्षाने अमृतसरमधून मला उमेदवारी नाकारली व तेथून अरुण जेटली यांना संधी दिली. तेथे काय झाले हे सगळ्यांनी बघितले आहे, असेही सिद्धू यांनी सांगितले.
देशातील तरुणांसाठी सरकारने फार काहीही केलेले नाही. मला जर संधी मिळाली तर मी बेरोजगार तरुणांसाठी खूप काही करीन. राजकारणाच्या मध्यवर्ती केंद्रात पुन्हा येण्यास मदत करेल अशी कोणतीही राजकीय जबाबदारी स्वीकारण्याची माझी तयारी आहे, असेही ते म्हणाले.
पंजाब विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी भाजपाला लोकप्रिय चेहऱ्याची गरज आहे. ती पूर्ण करण्याची क्षमता असतानाही पक्ष माझ्याकडे दुर्लक्ष करीत आहे. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी सिद्धू यांना आपमध्ये येण्याचे आमंत्रण दिलेले आहे, याकडे लक्ष वेधून ही परिस्थिती अशीच राहिल्यास आपण वेगळा मार्ग चोखाळू शकतो, असेही सिद्धू यांनी सूचित केले.