Navneet Rana Devendra Fadnavis: गृहमंत्री देवेंद्र फडणवीस आता खा. नवनीत राणांवर कारवाईचे आदेश देतील का?; राष्ट्रवादीचा सवाल
By ऑनलाइन लोकमत | Published: September 9, 2022 02:55 PM2022-09-09T14:55:54+5:302022-09-09T14:56:59+5:30
भाजप नेत्यांकडून महाराष्ट्र पोलिसांचे खच्चीकरण करण्याचा डाव असल्याचाही राष्ट्रवादीचा आरोप
Navneet Rana Devendra Fadnavis: मुंबईत याकुब मेमन आणि अमरावतीत कथित लव्ह जिहादचा मुद्दा उपस्थित करून भाजपा नेत्यांकडून महाराष्ट्र पोलिसांचे खच्चीकरण करण्याचा प्रयत्न सुरू होता. तसेच या मुद्द्यांच्या मार्फत शिवाय जातीय तेढ वाढवण्याचाही प्रयत्न होता, असा गंभीर आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे राज्य मुख्य प्रवक्ते महेश तपासे यांनी केला. एका युवतीला डांबून ठेवल्याचा आरोप करत खासदार नवनीत राणा यांनी काल अमरावती पोलिसांशी हुज्जत घातली होती, मात्र त्या युवतीने स्वतःहून रागाच्या भरात घरातून निघून गेल्याचे पोलिसांना दिलेल्या जबाबात स्पष्ट झाले. त्यामुळे अशा प्रकरणात कुणाला रस होता हे समोर आले असून या प्रकरणी जातीय तेढ निर्माण करणार्या नवनीत राणांसारख्या नेत्यांवर कारवाई करण्याची भूमिका गृहमंत्री देवेंद्र फडणवीस घेणार का? असा रोखठोक सवालही राष्ट्रवादीकडून करण्यात आला.
अमरावती शहरातील राजापेठ पोलीस स्टेशनमध्ये एका युवतीचे अपहरण झाल्याची तक्रार घेऊन खासदार नवनीत राणा पोहोचल्या होत्या. त्यांनी हे लव्ह जिहादचे प्रकरण असल्याचा आरोप करत पोलीस ठाण्यातच पोलिसांसोबत हुज्जत घालून राडा केला होता. खासदार नवनीत राणा यांचा रूद्रावतार पाहून पोलिस कर्मचारीही सुरूवातीला गोंधळून गेले. पण अखेर ती युवती स्वत:च्या मर्जीने घरातून निघून गेल्याचे स्पष्ट झाल्याने नवनीत राणा तोंडघशी पडल्या. त्यानंतर पोलीसांच्या संघटनेने नवनीत राणांचा जाहीर निषेध केला. नवनीत राणा यांच्यावर शासकीय कामात अडथळा निर्माण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल व्हावा. तसेच वारंवार पोलिसांबद्दल अपमानास्पद बोलणे त्यांनी टाळावं व त्यांनी तात्काळ पोलिसांची माफी मागावी अशी मागणीही महाराष्ट्र पोलीस भरती संघटनेच्या वतीने करण्यात आली. या वादात राष्ट्रवादीने उडी घेत, अशा प्रकारे धार्मिक किंवा जातीय तेढ निर्माण करणाऱ्यांवर गृहमंत्री फडणवीस कारवाई करणार का? असा सवाल तपासे यांनी उपस्थित केला.
भाजपा आमदार राम कदमांवरही टीका
"बुधवारी याकुब मेमनच्या कबरीचा विषय भाजपा आमदार राम कदम यांनी ट्वीट करत जातीय तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केला. त्यातही तो जुना फोटो असल्याचे समोर आले. या घटनेमधून जातीय तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न होता का? याचाही तपास करण्यात यावा. सुशांतसिंग राजपूतच्या आत्महत्येनंतर मुंबई पोलिसांच्या कारवाईवर संशय व्यक्त करण्यात आला होता तर दुसरीकडे पालघरमध्ये साधूंच्या हत्येप्रकरणीही पोलिसांकडे बोट दाखवण्यात आले होते. मध्यंतरी हनुमान चालिसा म्हणण्याचा हट्ट राणा दांपत्याने करुन पोलिसांना बघून घेण्याची धमकी दिली होती. त्यातच आता तर खासदार नवनीत राणा यांनी अमरावती पोलिसांशी हुज्जत घालून सरकारी कामात अडथळा निर्माण केला. त्यामुळे राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस नवनीत राणा यांच्यावर कारवाई करण्याचे आदेश देतील अशी अपेक्षा आहे. पण याकुब मेमन आणि कथित लव्ह जिहादचा विषय आणून राज्यातील वातावरण गढूळ करण्याचा प्रयत्न केला जात आहे. जातीय तेढ निर्माण करणार्या अशा नेत्यांवर कारवाई करण्याची गृहमंत्री देवेंद्र फडणवीस तसदी घेतील का?" असा सवाल महेश तपासे यांनी केला आहे.