Navneet Rana got Discharge: उद्धव ठाकरे, हवा तो मतदारसंघ निवडा, माझ्याविरोधात जिंकून दाखवा; नवनीत राणांचे डिस्चार्ज मिळताच आव्हान
By ऑनलाइन लोकमत | Published: May 8, 2022 12:08 PM2022-05-08T12:08:32+5:302022-05-08T12:09:37+5:30
Navneet Rana big Announcement against Uddhav Thackeray: मी मुंबईची मुलगी आहे. मुंबईत दोन पिढ्यांपासून सत्ता आहे त्यांच्याविरोधात मी येत्या महापालिका निवडणुकीमध्ये प्रचार करणार आहे. मुंबईत जे रामभक्त आहेत त्यांच्या प्रचारासाठी मी उभी राहणार आहे, असे नवनीत राणा यांनी म्हटले आहे.
हनुमान चालिसा वाचणे जर गुन्हा असेल तर मी १४ वर्षे शिक्षा भोगण्यास तयार आहे. तरी देखील मी पुन्हा उभी राहीन. यापुढे माझा लढा सुरुच राहणार आहे. उद्धव ठाकरेंना माझे आव्हान आहे की त्यांनी माझ्याविरोधात कुठेही निवडणूक लढवून दाखवावी आणि जिंकून दाखवावे, असे आव्हान खासदार नवनीत राणा यांनी ठाकरेंना दिले आहे. राणा यांना आज लिलावती हॉस्पिटलमधून डिस्चार्ज देण्यात आला.
मी कोणता गुन्हा केला ज्याची मला शिक्षा मिळाली. क्रूर बुद्धीने महिलेवर, लोकप्रतिनिधीवर कारवाई करण्यात आली. केसवर मी बोलणार करणार नाही. माझ्यावर जो अन्याय झाला, तुरुंगात ते पोलीस ठाण्यात त्यावर मी लवकरच बोलणार आहे. डॉक्टरांनी अर्जंट चेकअप करण्याचे लिहून दिले होते. मी डॉक्टरांना रिक्वेस्ट करून ओपीडीद्वारे उपचार करणार आहे. डॉक्टरांना डिस्चार्ज द्यायचा नव्हता, असे नवनीत राणा म्हणाल्या.
एवढा अत्याचार केला, तुमच्याकडे ताकद आहे म्हणून. लोकांसमोर येऊन तुम्ही निवडणूक लढवून दाखवा. महिलेची ताकद काय आहे हे मी दाखवून देईन. त्यांनी माझ्याविरोधात निवडून येऊन दाखवावे. उद्धव ठाकरेंनी कोणताही मतदारसंघ निवडावा, त्यांच्याविरोधात मी उभी राहणार आहे. महाराष्ट्राची जनता माझ्यावर झालेल्या अत्याचाराचे उत्तर देईल. येणाऱ्या महापालिका निवडणुकीत मी पूर्ण ताकदीने लढा देणार आहे, असे शिवसेनेला आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना आव्हान दिले आहे.
रामभक्तांचा मुंबईत प्रचार करणार
मी मुंबईची मुलगी आहे. मुंबईत दोन पिढ्यांपासून सत्ता आहे त्यांच्याविरोधात मी येत्या महापालिका निवडणुकीमध्ये प्रचार करणार आहे. मुंबईत जे रामभक्त आहेत त्यांच्या प्रचारासाठी मी उभी राहणार आहे. माझे घर जरी पाडले तरी रस्त्यावर राहून प्रचार करेन, असेही नवनीत राणा यांनी म्हटले आहे.