Navneet Rana Hanuman Chalisa Case: संसदेत महत्वाच्या बैठकीचे कारण; नवनीत राणा दाम्पत्याने मारली सुनावणीला दांडी, मिळाली पुढची तारीख
By ऑनलाइन लोकमत | Published: May 18, 2022 12:57 PM2022-05-18T12:57:32+5:302022-05-18T13:02:03+5:30
Navneet Rana Hanuman Chalisa Case: सर्वोच्च न्यायालयाने एका कलमाला स्थगिती दिली आहे, अन्य कलमांखाली सुनावणी सुरु राहू शकते. यामुळे पुढील तारखेला राणा दाम्पत्याला न्यायालयात हजर रहावे लागणार आहे.
हनुमान चालिसा वादावरून मुंबईतील न्यायालयाने नवनीत राणा, रवी राणा यांना अटींवर जामिन दिला होता. नवनीत राणा या लिलावती हॉस्पिटलमधून आल्यावर त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, हनुमान चालिसा पठनावरून वक्तव्य केले होते. यावर सरकारी वकील प्रदीप घरत यांनी राणा यांनी अटींचे उल्लंघन केल्याचा दावा करत न्यायालयाला जामीन रद्द करण्याची विनंती केली होती. यावर आज सुनावणी होती. परंतू यास राणा दाम्पत्य गैरहजर राहिले.
सर्वोच्च न्यायालयाने एका कलमाला स्थगिती दिली आहे, अन्य कलमांखाली सुनावणी सुरु राहू शकते. यामुळे राणा दाम्पत्याला न्यायालयात हजर रहावे लागणार आहे. जर न्यायालयात जामिनावरील अटींचे उल्लंघन केल्याचे सिद्ध झाले तर त्यांना कोठडी सुनावली जाणार आहे. राणा दाम्पत्याला या तारखेलाच मुभा मिळाली आहे, पुढील तारखेला त्यांना न्यायालयात हजर रहावे लागणार आहे, असे सरकारी वकील प्रदीप घरत यांनी सांगितले.
गेल्या तारखेलाच नोटीस देऊन हजर राहण्यास सांगितले होते. सर्वोच्च न्यायालयाने राजद्रोहाचे १२४ ए कलम स्थगित केलेले आहे. जेव्हा मी कोर्टात आलो तेव्हा आम्हाला कळले की आम्हाला त्याची कॉपीच दिली गेलेली नाही. आरोपींनी अटींचे उल्लंघन केल्याचा आणि सर्वोच्च न्यायालयाच्या स्थगितीचा काहीही संबंध नाही. राणा गैरहजर असले तरी त्यांचे वकील हजर होते. त्यांच्या वकीलांनी काही कागदपत्रे दिली आहेत, ती पोलिसांना किंवा प्रसारमाध्यमांना देण्यात येऊ नयेत असे म्हटले आहे. यामुळे एवढी गोपनिय असतील तर मी देखील पाहू की नको हे ठरवावे लागेल, असे घरत म्हणाले.
Hanuman Chalisa outside Maharashtra CM's house row | Mumbai Sessions Court had directed MP and MLA Navneet Rana-Ravi Rana to appear before them today but they failed to do so. Their lawyer Rizwan Merchant sought exemption from Court. Next date of hearing is on 15th June
— ANI (@ANI) May 18, 2022
दुसरीकडे राणा दाम्पत्याचे वकील रिज़वान मर्चन्ट यांनी सांगितले की, कोर्टाने नोटीस दिली होती. त्यामध्ये राणा दाम्पत्याला येणे बंधनकारक होते. परंतू नवनीत राणा संसदेतील एका महत्वाच्या बैठकीला हजर आहेत, त्यामुळे त्या येऊ शकल्या नाहीत. तर त्यांची तब्येत बरी नसल्याने पती रवी राणा त्यांच्यासोबत बैठकीच्या ठिकाणी आहेत. यामुळे दोघेही हजर राहू शकले नाहीत.
मातोश्रीवर हनुमान चालिसा वाचण्याचा गुन्हा आहे. यावर आमची कोणतीही चर्चा झाली नाही. हनुमान चालिसा वाचण्यावर कोणतेही न्यायालय बंदी आणू शकत नाही. केसच्या संबंधीत कोणतीही मुलाखत वक्तव्य न करण्याची अट होती, ती त्यांनी पाळली आहे, पुढेही या अटीचा भंग करण्याची त्यांचा मनसुबा नाही, असे ते म्हणाले.