Navneet Rana in Delhi: आदित्य ठाकरेंनाही असेच तुरुंगात टाकले जाईल, तेव्हाच...; नवनीत राणांचा दिल्लीत संताप अनावर
By ऑनलाइन लोकमत | Published: May 10, 2022 06:22 AM2022-05-10T06:22:52+5:302022-05-10T06:23:25+5:30
Navneet Rana statement on Aditya Thackeray arrest: राणा दाम्पत्याची अध्यक्षांकडे तक्रार, बिरला यांची भेट : २३ रोजी हक्कभंग समितीसमोर बाजू मांडणार
लोकमत न्यूज नेटवर्क
नवी दिल्ली : महाराष्ट्र पोलिसांनी दिलेल्या ‘अमानवीय’ वागणुकीची तक्रार लोकसभा अध्यक्ष ओम बिरला यांच्याकडे खासदार नवनीत राणा यांनी केली. या संदर्भात लोकसभेच्या हक्कभंग समितीसमोर २३ मे रोजी खासदार राणा बाजू मांडणार आहेत.
राजद्रोहाच्या गुन्ह्याखाली आरोपी असलेले खासदार नवनीत राणा व आमदार रवी राणा हे दाम्पत्य न्यायालयाकडून जामीन मिळाल्यानंतर सोमवारी दुपारी दिल्लीत दाखल झाले. यावेळी पत्रकारांशी बोलताना त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर आपल्याला अमानवीय वागणूक दिल्याचा आरोप केला.
कोणताही गुन्हा नसताना आपल्याला १२ दिवस तुरुंगात डांबले. आदित्य ठाकरे यांना अशाच प्रकारे तुरुंगात टाकण्यात येईल, तेव्हाच त्याची जाणीव मुख्यमंत्र्यांना होईल, अशा शब्दात खासदार राणा यांनी संताप व्यक्त केला.
लोकसभा अध्यक्षांकडे आपबीती
सायंकाळी साडेपाच वाजता त्यांनी लोकसभा अध्यक्ष ओम बिरला यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली. यावेळी आमदार रवी राणासुद्धा सोबत होते. यावेळी महाराष्ट्र पोलिसांनी दिलेल्या वागणुकीची आपबीती त्यांनी लोकसभा अध्यक्षांना सांगितली. लोकसभा अध्यक्ष ओम बिरला यांनी या तक्रारीची गंभीर दखल घेतली जाईल, असे आश्वासन दिले. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची त्या भेट घेणार आहेत. शहा सध्या आसाम दौऱ्यावर असून, ते मंगळवारी दिल्लीत येत आहेत. यानंतर त्या केंद्रीय गृहमंत्र्यांची भेट घेणार असल्याचे सांगण्यात आले.