राणा दाम्पत्याला कारागृह की जामिनावर सुटका?, आज फैसला
By ऑनलाइन लोकमत | Published: May 2, 2022 09:57 AM2022-05-02T09:57:58+5:302022-05-02T09:58:31+5:30
सत्र न्यायालयाने शनिवारी या दोघांच्या जामीन अर्जावरील निकाल २ मे पर्यंत राखून ठेवला.
मुंबई : हनुमान चालीसा प्रकरणी न्यायालयीन कोठडीत असलेल्या अमरावतीच्या अपक्ष खासदार नवनीत राणा व आमदार रवी राणा हे कारागृहातच राहणार की जामिनावर सुटका होणार, याचा फैसला आज होणार आहे. सत्र न्यायालयाने शनिवारी या दोघांच्या जामीन अर्जावरील निकाल २ मे पर्यंत राखून ठेवला.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या ‘मातोश्री’ निवासस्थानाबाहेर हनुमान चालीसा पठणाची घोषणा केल्यानंतर राणा दाम्पत्याने तो कार्यक्रम मागेही घेतला. कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार असल्याने खार पोलिसांनी राणा दाम्पत्याला २३ एप्रिल रोजी अटक केली. त्यांच्यावर राजद्रोह व दोन गटांत वैमनस्य निर्माण करण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा नोंदविण्यात आला. न्यायालयाने त्यांना १४ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. त्यानंतर त्यांनी जामिनासाठी अर्ज केला.
आम्ही राजद्रोहासारखा कोणताही गुन्हा केला नाही. लोकशाहीत प्रत्येकाला टीका करण्याचा अधिकार आहे. मुख्यमंत्र्यांच्या घराबाहेर हनुमान चालीसा पठणासाठी परवानगी कशाला हवी? आम्ही मशिदीबाहेर हनुमान चालीसा पठणाची घोषणा केली नाही. कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला असता आम्ही ‘मातोश्री’लाही आव्हान दिले नाही. आम्हाला फक्त मातोश्रीवर जायचे होते, असा युक्तिवाद राणा दाम्पत्याच्यावतीने ॲड. आबाद पौडा यांनी न्यायालयात केला.
त्यावर विशेष सरकारी वकील प्रदीप घरत यांनी राणांच्या जामीन अर्जावर आक्षेप घेतला. ‘प्रत्येकाला लोकशाहीवर टीका करण्याचा अधिकार आहे. पण त्यास मर्यादा आहे. जेव्हा ही मर्यादा ओलांडली जाते तेव्हा राजद्रोहाचा आरोप ठेवला जातो. तुम्हाला लोकांबरोबर हनुमान चालीसाचे पठण करायचे होते, तेव्हाच तुम्ही मर्यादा ओलांडली. या देशात बहुसंख्य हिंदू असल्याने ‘हिंदुत्वाचा’ वापर हुकमाच्या एक्क्याप्रमाणे केला जातो. हे सरकार हिंदूंच्या कसे विरोधात आहे, हे दाखवण्याचा प्रयत्न सुरू आहे. राणा यांनी मुख्यमंत्र्यांविरोधात आक्षेपार्ह भाषा वापरली असून मातोश्रीबाहेर प्रक्षोभक वक्तव्य केले, असा युक्तिवाद घरत यांनी केला.