Navneet Rana : "उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय"; दसरा मेळाव्यावरून नवनीत राणांची बोचरी टीका
By ऑनलाइन लोकमत | Published: October 6, 2022 11:04 AM2022-10-06T11:04:27+5:302022-10-06T11:58:54+5:30
Navneet Rana Slams Shivsena Uddhav Thackeray : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या दसरा मेळाव्यातील भाषणावरून अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांनी जोरदार हल्लाबोल केला आहे.
शिवसेनेत पडलेल्या उभ्या फुटीनंतर यावर्षी उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखालील शिवसेना आणि शिंदे गट यांच्या होणाऱ्या दसरा मेळाव्यांकडे राज्यातील राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले होते. शिवसेनेचा दसरा मेळावा शिवतीर्थावर तर शिंदे गटाचा दसरा मेळावा हा बीकेसीमधील मैदानात पार पडला. यानंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Shivsena Uddhav Thackeray) यांच्या दसरा मेळाव्यातील भाषणावरून अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांनी जोरदार हल्लाबोल केला आहे. "उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलं" असं म्हणत बोचरी टीका केली आहे.
"उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे हे फक्त बाळासाहेबांच्या प्रॉपर्टीचे वारसदार होऊ शकतात विचारांचे नाही" असं म्हणत नवनीत राणा (Navneet Rana) यांनी निशाणा साधला आहे. "मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बाळासाहेब ठाकरे यांचे विचार मांडले ते ऐकण्यासाठी लोकं त्यांच्या सभेत आले होते" असंही म्हटलं आहे. तसेच "एकनाथ शिंदे हेच बाळासाहेब ठाकरेंची विचारधारा पुढं नेऊ शकतात" असं देखील सांगितलं. आपल्या ट्विटर अकाऊंटवरून राणा यांनी याबाबत व्हिडीओ शेअर केला आहे.
— Navnit Ravi Rana (@navneetravirana) October 5, 2022
"बाळासाहेबांचे विचार हे खऱ्या अर्थाने एकनाथ शिंदेंसोबत"
"उद्धव ठाकरे हे वारंवार बाप चोरला असं सांगतात पण उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे हे फक्त बाळासाहेबांच्या प्रॉपर्टीचे वारसदार होऊ शकतात, विचारधारा ही एकनाथ शिंदेंसोबत आहे. उद्धव ठाकरेंचे संतुलन पूर्ण बिघडलं आहे, हे जनतेने पाहिलंय. कारण सभेत उद्धव ठाकरे फक्त फिल्मचे डॉयलॉग सांगत होते. अडीच वर्ष उद्धव ठाकरे घरात बसले होते त्यांनी फक्त फेसबुक लाईव्ह केलं, बाळासाहेबांचे विचार हे खऱ्या अर्थाने एकनाथ शिंदेंसोबत आहेत" असं नवनीत राणा यांनी म्हटलं आहे.
दसरा मेळाव्यांमध्ये किती शिवसैनिकांची उपस्थिती होती याबाबतचे वेगवेगळे तर्कवितर्क लढवले जात आहेत. आता पोलिसांनीही शिवतीर्थ आणि बीकेसी येथील दसरा मेळाव्यात किती शिवसैनिकांची उपस्थिती होती. याबाबतची अंदाजित आकडेवारी मांडली आहे. पोलिसांनी सांगितलेल्या या अंदाजित आकडेवारीनुसार मुंबईतील शिवतीर्थावर झालेल्या उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखालील शिवसेनेच्या दसरा मेळाव्यासाठी सुमारे एक लाख शिवसैनिक उपस्थित होते. तर एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वाखाली बीकेसी येथील मैदानात झालेल्या शिंदे गटाच्या दसरा मेळाव्याला दोन लाख शिवसैनिकांची उपस्थिती होती, असा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठीवेबसाईट "लोकमत डॉट कॉम"