Navratri 2018 : जाणून घ्या महाराष्ट्रातील साडेतीन शक्तिपीठांचं महत्त्व!

By ऑनलाइन लोकमत | Published: October 11, 2018 02:31 PM2018-10-11T14:31:15+5:302018-10-11T14:33:25+5:30

आपल्या देशामध्ये धार्मिक स्थळांना फार महत्त्व आहे. प्रत्येक धार्मिक स्थळाला स्वतःचा असा इतिहास आणि वेगळं वैशिष्ट्य प्राप्त झालं आहे. फक्त भारतातूनच नाही तर जगभरातून अनेक भाविक या स्थळांना भेट देण्यासाठी गर्दी करत असतात.

Navratri 2018 Things you should know about Shakti Peeth in Maharashtra | Navratri 2018 : जाणून घ्या महाराष्ट्रातील साडेतीन शक्तिपीठांचं महत्त्व!

Navratri 2018 : जाणून घ्या महाराष्ट्रातील साडेतीन शक्तिपीठांचं महत्त्व!

Next

आपल्या देशामध्ये धार्मिक स्थळांना फार महत्त्व आहे. प्रत्येक धार्मिक स्थळाला स्वतःचा असा इतिहास आणि वेगळं वैशिष्ट्य प्राप्त झालं आहे. फक्त भारतातूनच नाही तर जगभरातून अनेक भाविक या स्थळांना भेट देण्यासाठी गर्दी करत असतात. याच धार्मिक स्थळांपैकी एक म्हणजे महाराष्ट्रातील शक्तिपिठं. 

सध्या नवरात्रौत्सवास सुरुवात झाली असून ठिकठिकाणच्या तिर्थक्षेत्रांवर भाविकांनी देवीच्या दर्शनासाठी गर्दी केली आहे. भारतामध्ये एकूण 51 शक्तिपिठं आहेत त्यातील साडेतीन शक्तिपीठ महाराष्ट्रामध्ये आहेत. या शक्तिपीठांनादेखील फार मोठं महत्त्व आहे. महाराष्ट्रामध्ये तुळजापूर, कोल्हापूर, नाशिक आणि माहूर येथे ही शक्तिपीठं आहेत. देवीची ही शक्तिपीठं संपूर्ण देशभरामध्ये प्रसिद्ध आहेत. या शक्तिपीठांबाबत अनेक आख्यायिका सांगितल्या जातात. जाणून घेऊयात शक्तिपीठांच्या महत्त्वाबाबत.... 

1. महालक्ष्मी मंदिर, कोल्हापूर

महाराष्ट्रातील साडेतीन शक्तिपिठांपैकी पहिले शक्तिपीठ कोलापूर (कोल्हापूर) येथे आहे. हे पूर्ण शक्तिपीठांपैकी एक असून या मंदिराचे बांधकाम कोणी केलं, याबाबत अद्याप कोणतीही ठोस माहिती उपलब्ध नाही. काही संशोधकांनी केलेल्या संशोधनातून असा निष्कर्ष काढला की, शिलाहार राजवटीपूर्वी कार्हारक (सध्याचे कराड) या प्रांतातील सिंध वंशातील राजाने हे मंदिर बांधले असावे. या मंदिराच्या मुख्य वास्तूचे दोन मजले आहेत. या मंदिराचे संपूर्ण बांधकाम कोल्हापूरच्या आजुबाजूला मिळणाऱ्या काळ्या दगडामध्ये करण्यात आलेले आहे. हे मंदिर पश्र्चिमाभिमुख असून याच्या प्रवेशद्वाराजवळ नगरखाना देखील आहे. 

या मंदिरातील महालक्ष्माची मूर्ती 1.22 मीटर उंच असून 0.91 मीटर उंच दगडावर ठेवण्यात आली आहे. या मंदिरामध्ये घाती दरवाजा, गरुड मंडप इत्यादी कोरीव केलेल्या कलाकृती आहेत. 

2. श्री क्षेत्र तुळजापूर, तुळजाभवानी

महाराष्ट्रातील उस्मानाबाद जिल्ह्यात वसलेले तुळजापूर हे महत्वाचे तीर्थक्षेत्र असून त्याठिकाणी तुळजाभवानी देवीचे प्राचीन मंदिर आहे. हे शक्तिपीठ पूर्ण आणि आद्यपीठ मानलं जातं. 

स्कंद पुराणातील सह्याद्री विभागात या देवीची कथा सांगण्यात येते. कृतयुगात म्हणजेच जवळपास १७,२८०० वर्षापूर्वी जेव्हा ऋषी कर्दमाची पत्नी अनुभूती ध्यान करत होती. तेव्हा कुकर राक्षसाने तिला मारण्याचा प्रयत्न केला. तेव्हा तिने स्वत: ला त्या राक्षसापासून वाचवण्यासाठी भगवती देवीचे नामस्मरण केले. त्यावेळी देवी भगवती प्रकट झाली आणि त्याच्याशी लढाई करून त्या राक्षसाचा वध केला. त्यानंतर अनुभूतीच्या विनंतीमुळे देवी डोंगरावर राहण्यास तयार झाली. या देवीला तुर्जा-तुळजा (भवानी) असेही म्हटले जाते. 

या देवीचे मंदिर बालाघाटावरील एका डोंगरमाथ्यावर असून मंदिराची बांधणी हेमाडपंती पद्धतीने केलेली आहे. नवरात्रीचा उत्सव जरी नऊ दिवसांचा असला तरी तुळजापूरात मात्र हा उत्सव एकवीस दिवस चालतो. 

तुळजाभवानी देवीच्याच आशीर्वादाने शिवाजी महाराजांना स्वराज्य स्थापनेची प्रेरणा मिळाली होती. मंदिराच्या दक्षिणेकडील प्रवेशद्वाराला परमार दरवाजा म्हणतात. दरवाजावर एक आज्ञापत्र ठेवण्यात आले आहे ज्यात असे म्हटले आहे की, जगदेव परमार नावाच्या एका महान भक्ताने सात वेळा देवतेच्या चरणी प्रार्थना केली.

3. रेणुकादेवी, माहूर

देवीच्या पूर्ण शक्तीपीठांपैकी माहूरची देवी रेणुकामाता हे एक पीठ आहे. तिला श्री परशुरामाची आई म्हणून ओळखली जाते. असे म्हणतात की हे मंदिर तेराव्या शतकात देवगिरीच्या यादव राजाने बांधले आहे. माहूर येथील किल्ल्यात देवीच्या मंदिरासह इतर देवांची देखील मंदिरं आहेत. त्यामध्ये परशुराम मंदिर, दत्तात्रय मंदिर, अनासू मंदिर, कालिकामाता मंदिर यांसारख्या मंदिरांचा समावेश आहे. रामगड किल्ला हा माहूरच्या जवळपास आहे आणि त्यामध्ये सुंदर कोरीव काम केलेल्या लेणी देखील आहेत. हे ठिकाण नांदेड जिल्ह्याच्या माहूर तालुक्यामध्ये आहे.

4. सप्तशृंगीदेवी, वणी

साडेतीन शक्तीपीठांपैकी अर्धा शक्तीपीठाचा मान हा संप्तश्रुंगीदेवीचा आहे. येथे महाकाली, महालक्ष्मी आणि महासरस्वती या तिघींचेही हे एकच रूप आहे, असं मानण्यात येतं. पृथ्वीतलावर जंगदंबेची वेगवेगळी रूपं आहेत. त्यापैकी सप्तशृंगीदेवीचे रूप या तीन देवींचे एक रूप आहे. शुंभनिशुंभ आणि महिषासुर या राक्षसांचा वध केल्यानंतर देवी येथे तप आणि साधना करायला राहत होती. अशी आख्यायीका सांगण्यात येते. सह्याद्रीच्या उंच पर्वतरांगांमध्ये सात शिखरं आहेत. त्यावरूनच या ठिकाणाचे नाव सप्तशृंगी गड ठेवण्यात आले आहे. हिंदू पंचांगनुसार प्रत्येक नवरात्र आणि चैत्र महिन्यामध्ये येथे उत्सव भरवण्यात येतो. 

सप्तशृंगीदेवी नाशिकपासून 65 किलोमीटरवरील 4800 फूट उंचीवरील सप्तशृंग गडावर वसलेली आहे. या देवीच्या मुर्तीविषयी देखील एक अख्यायिका सांगण्यात येत ती म्हणजे, एका धनगराला येथे एक मधमाशांचे पोळं दिसलं होतं. त्या धनगराने ते पोळं काठीच्या सहाय्याने काढण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी त्या काठिला शेंदूर लागला. त्याने पोळे काढल्यानंतर त्याला तिथे देवीची मूर्ती सापडली. 

हे मंदिर डोंगराची कपार खोदून तयार करण्यात आलेले आहे. यामध्ये महिरपीत देवीची आठ फूटाची मूर्ती अठरा भुजा मूर्ती आहे.  मूर्ती शेंदूरअर्चित, रक्तवर्ण असून डोळे टपोरे आहेत. यामुळे देवीचं रूप तेजस्वी दिसतं. त्याचप्रमाणे देवीचे सर्व हात एकमेकांना लागून आहेत. सर्व देवांनी महिषासुरासारख्या राक्षसाचा नाश करण्यासाठी देवीला शस्त्रही दिली आहेत. 

Web Title: Navratri 2018 Things you should know about Shakti Peeth in Maharashtra

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.