Navratri 2021: कोविडबाधित महिलेसह बाळाला जीवदान देणारी नवदुर्गा; डॉ. शुभांगी देवसरकर ठरल्या देवदूत

By ऑनलाइन लोकमत | Published: October 7, 2021 09:27 AM2021-10-07T09:27:48+5:302021-10-07T09:28:06+5:30

नांदेडात येईपर्यंत बाळंतकळा सुरू झाल्या. तिथे एका रुग्णालयात भरती केल्यानंतर रक्त चाचण्यांचा अहवाल पाहून बाळंतपण करण्यास डॉक्टरांनी नकार दिला

Navratri 2021: Navdurga Dr. Shubhangi Devsarkar who gave life to a baby with a covid woman | Navratri 2021: कोविडबाधित महिलेसह बाळाला जीवदान देणारी नवदुर्गा; डॉ. शुभांगी देवसरकर ठरल्या देवदूत

Navratri 2021: कोविडबाधित महिलेसह बाळाला जीवदान देणारी नवदुर्गा; डॉ. शुभांगी देवसरकर ठरल्या देवदूत

googlenewsNext

श्रीनिवास भोसले

नांदेड : रखरखत्या उन्हाचे दिवस अन् कोरोनाचा कहर... बाधितांना बेडही मिळेना... रुग्णालयांच्या व्हरांड्यातही रुग्ण... जवळही कोणी येईना... अशा भयावह वातावरणात कोरोनाबाधित पोटुशी महिलेने रात्रभर आठ ते दहा रुग्णालयांचे उंबरठे झिजवले. पण तिला कोणीही दाद दिली नाही... शेवटी तिची अवस्था समजून तिच्या मदतीला धावली ‘ती’च... या आधुनिक आदिशक्ती दुर्गेचं नाव आहे डॉ. शुभांगी अंकुश देवसरकर.

मार्च-एप्रिल महिन्यात कोरोनाने अक्षरश: थैमान घातले होते. ऑक्सिजन बेड मिळणेही मुश्कील होते. त्यात गरोदर महिला पॉझिटिव्ह आली तर तिला भरती करून घेण्यास अनेक रुग्णालये नकार देत होती. त्यामुळे गरोदर महिला अन् त्यांच्या नातेवाईकांची त्रेधा उडत होती. अशातच एप्रिलमध्ये एका महिलेला नऊ महिने नऊ दिवस पूर्ण झाले. महिलेला रक्तदाब, हाता-पायावर सूज असल्याने काळजीपोटी पतीने वसमतच्या रुग्णालयात भरती केले. तिथे तपासणीनंतर ती कोरोनाबाधित असल्याचे समजले आणि डॉक्टरांची वागणूकच बदलली. त्यांनी लगेचच हायर सेंटरला घेऊन जाण्याचा सल्ला देत नांदेडला पाठवले.

नांदेडात येईपर्यंत बाळंतकळा सुरू झाल्या. तिथे एका रुग्णालयात भरती केल्यानंतर रक्त चाचण्यांचा अहवाल पाहून बाळंतपण करण्यास डॉक्टरांनी नकार दिला. मध्यरात्रीची वेळ असल्याने सैरभैर होऊन नातेवाईकांनी जवळपास आठ ते दहा दवाखान्यांमध्ये विचारणा केली, परंतु रिस्क असल्याचे कारण देत प्रत्येक डॉक्टरांनी सरकारी रुग्णालयाचाच रस्ता दाखवला. शासकीय रुग्णालयातही आयसीयू बेड उपलब्ध नसल्याचे सांगण्यात आले. अखेर नातेवाईकांनी डॉ. अंकुश देवसरकर यांच्याशी संपर्क साधला. परिस्थिती लक्षात घेत डॉ. शुभांगी देवसरकर यांनी कोणत्याही फॉर्मिलिटी अथवा चाचण्या न करता ताबडतोब भरती करून घेतले. बाळाच्या हृदयाचे ठोके कमी होऊ लागल्याने ऐनवेळी सिझेरियनचा निर्णय घेतला अन् कोरोनाबाधित महिलेचे पहिले सिझर भगवती रूग्णालयात पार पडले. वेळीच उपचार मिळाल्याने बाळ आणि बाळंतिणीचा जीव वाचू शकला. एका स्त्रीच्या वेदनांना समजून घेत तिच्या मदतीला धावणाऱ्या डॉ. शुभांगी यांच्या रुपाने नारीशक्तीचे दर्शनच कोरोनाकाळात घडले. त्यांच्या कर्तृत्वाला सलाम !

रुग्णांच्या मदतीला धावल्या डॉ. शुभांगी
कडकडीत लॉकडाऊन असताना रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांना रुग्णालयाकडूनच मोफत भोजन. ग्रामीण भागातील महिलांसाठी आरोग्य शिबिरांच्या माध्यमातून मासिक पाळीबाबत जनजागृती. कोणत्याही परिस्थितीत जोखीम उचलून रुग्णसेवेसाठी तत्पर.

Web Title: Navratri 2021: Navdurga Dr. Shubhangi Devsarkar who gave life to a baby with a covid woman

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.