राज्यभरात घटस्थापनेने नवरात्रोत्सवास प्रारंभ, शक्तीपीठे गजबजली
By ऑनलाइन लोकमत | Published: September 30, 2019 05:10 AM2019-09-30T05:10:57+5:302019-09-30T05:11:15+5:30
वणीची सप्तशृंगी देवी, माहूरची रेणुकामाता, तुळजापूरची आई तुळजाभवानी आणि कोल्हापूरची अंबाबाई या महाराष्ट्रातील साडेतीन शक्तीपीठांसह राज्यात ठिकठिकाणी पारंपरिक उत्साहात आणि भक्तीभावाने आईचा जयघोष करत घटस्थापना करुन राज्यात रविवारपासून नवरात्रोत्सवास प्रारंभ झाला.
कोल्हापूर/नाशिक/नांदेड/उस्मानाबाद : वणीची सप्तशृंगी देवी, माहूरची रेणुकामाता, तुळजापूरची आई तुळजाभवानी आणि कोल्हापूरची अंबाबाई या महाराष्ट्रातील साडेतीन शक्तीपीठांसह राज्यात ठिकठिकाणी पारंपरिक उत्साहात आणि भक्तीभावाने आईचा जयघोष करत घटस्थापना करुन राज्यात रविवारपासून नवरात्रोत्सवास प्रारंभ झाला.
करवीरनिवासिनी कोल्हापूरची अंबाबाई म्हणजे महाराष्ट्रातील साडेतीन शक्तिपीठांतील प्रमुख देवता. रविवारी अंबाबाईची त्रिपुरासुंदरी रूपात बैठी सालंकृत पूजा बांधण्यात आली. पहाटे काकडआरती, पहिला अभिषेक झाल्यानंतर मंदिराचे व्यवस्थापक धनाजी जाधव यांच्या हस्ते गाभाऱ्यात घटस्थापना करण्यात आली. तोफेच्या सलामीने नवरात्रौत्सवाला प्रारंभ झाला. दुपारी साडेबाराची आरती झाल्यानंतर अंबाबाईची त्रिपुरसुंदरी देवीच्या रूपात पूजा बांधण्यात आली.
साडेतीन शक्तिपिठांपैकी एक सप्तशृंगी देवीच्या शारदीय नवरात्रोत्सवास मंगलमय वातावरणात हजारो भक्तांच्या साक्षीने सुरुवात झाली. उत्तर महाराष्ट्राचे कुलदैवत सप्तशृंगी देवी मंदिरात रविवारी पहिल्या माळेची महापूजा जिल्हा सत्र न्यायाधीश महेंद्र मंडाले यांनी सपत्नीक केली.
श्रीक्षेत्र माहूरगडावर श्री रेणुकामाता मंदिरात शारदीय नवरात्रोत्सवानिमित्त विधीवत महापूजेनंतर वेदघोषात घटस्थापना करण्यात आली़ यावेळी संस्थानचे अध्यक्ष तथा प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश दीपक धोळकिया यांची प्रामुख्याने उपस्थिती होती़
सकाळी महापूजेनंतर पिवळे महावस्त्र अर्पण करून अलंकार चढविण्यात आले़ यामध्ये पोहेहार, बोरमाळ, पुतळ्याची माळ, कर्णफुले, मत्स्यनथ, नवरत्नाच्या अलंकाराची बिंदी, सुवर्ण पिंपळपान यासह इतर अलंकार अर्पण करण्यात आले़ घटस्थापना झाल्यानंतर पिवळे महावस्त्र अलंकाररूपी मातेचे शैलपुत्रीरुपी दर्शन भाविक भक्तांनी घेतले़ नवरात्रोत्सवानिमित्त जगन्नाथपुरी येथून आलेले ८ वैदिक पंडित ९ दिवस चतुर्वेदाचे पारायण करणार आहेत.
तुळजापुरात जयघोष
‘आई राजा उदो..उदो, सदानंदीचा उदो..उदो’च्या जयघोषात हजारो भाविकांच्या साक्षीने श्री तुळजाभवानी देवीच्या मंदिरात पारंपारिक पद्धतीने सिंह गाभाºयात २९ सप्टेंबर रोजी मंदिर संस्थानचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी दीपा मुधोळ-मुंडे व त्यांंचे पती विश्वास मुंडे यांच्या हस्ते घटस्थापना करण्यात आली. संभळ व बँडच्या वाद्यात अध्यक्षा मुंडे, भोपे पुजारी, पाळेकर पुजारी, सेवेकरी यांच्यासमवेत गोमुख तीर्थ याठिकाणी ठेवण्यात आलेल्या तिन्ही घटजल कलशाची विधीवत पूजन करून दर्शन घेतले.