Navratri 2021: कोल्हापूरच्या प्रिया पाटीलचा अनोखा सेवाभाव; मृत कोरोनाबाधितांच्या अंत्यसंस्कारासाठी शववाहिकेचे सारथ्य
By ऑनलाइन लोकमत | Published: October 8, 2021 07:16 AM2021-10-08T07:16:03+5:302021-10-08T07:16:56+5:30
Navratri Special Stories: जाधववाडी येथे राहणारी प्रिया ही विवेकानंद महाविद्यालयात बी.एस्सी. अभ्यासक्रमाच्या प्रथम वर्षात शिकत आहे. तिचे वडील खाजगी कारखान्यात काम करतात
संतोष मिठारी
कोल्हापूर : कोरोनाच्या भीतीने एकमेकांचा स्पर्शही अव्हेरला जात होता. कोरोनाचा संसर्ग झाला म्हणून वाळीत टाकण्याचा विदारक अनुभव अनेकांना येत असताना अशा परिस्थितीमध्ये सामाजिक बांधिलकी काय असते, याची प्रचीती कोल्हापुरातील वीस वर्षीय युवती प्रिया प्रकाश पाटील हिच्या कामगिरीतून आली. शववाहिकेवर चालक म्हणून सेवा देत तिने कोरोनाने मृत्यू पावलेल्या ४५० नागरिकांचे मृतदेह स्मशानभूमीत पोहोचविले. त्यातील बहुतांश मृतदेहांवर अंत्यसंस्कारही तिनेच केले.
जाधववाडी येथे राहणारी प्रिया ही विवेकानंद महाविद्यालयात बी.एस्सी. अभ्यासक्रमाच्या प्रथम वर्षात शिकत आहे. तिचे वडील खाजगी कारखान्यात काम करतात. वडिलांच्या एका मित्राचा कोरोनाने मृत्यू झाला. त्यांचा मृतदेह अंत्यसंस्कारासाठी नेण्याकरिता सात तासांची प्रतीक्षा करावी लागली. त्यावर प्रिया हिने अशा कोरोनाने मृत झालेल्या लोकांचे मृतदेह स्मशानभूमीपर्यंत पोहोचविण्यासाठी योगदान देण्याचे ठरविले. त्यासाठी तिला वडिलांनी शिकविलेल्या चारचाकी चालविण्याच्या कौशल्याचा उपयोग झाला. भवानी फाउंडेशनच्या माध्यमातून तिने जून ते ऑगस्ट असे तीन महिने सेवा दिली. कोरोनाबाधितांना रुग्णालयात दाखल करण्यापासून ते त्यांच्या कुटुंबाला आधार देण्यापर्यंत आणि कोरोनाग्रस्तांच्या मृत्यूनंतर मृतदेहाला शववाहिकेतून स्मशानभूमीपर्यंत नेऊन प्रसंगी अंत्यसंस्कार करण्याचे काम तिने केले. यातून तिने अनेकांचा दुवा घेतला.
तिच्या या सेवाभावी कार्याची दखल घेत सतेज पाटील, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, शिवाजी विद्यापीठ, विवेकानंद कॉलेज, रोटरी क्लबने तिचा सत्कार केला. लोकराजा छत्रपती राजर्षी शाहू महाराज प्रतिष्ठानने तिला रणरागिणी पुरस्कार जाहीर केला आहे.
करून दाखविले
कोरोना काळात ही मुलगी काय सेवा देणार, असे अनेकांना वाटले. मात्र, सामाजिक बांधिलकी जपण्याच्या उद्देशाने शववाहिकेवर चालक म्हणून सेवा देत मी अशक्य ते शक्य करून दाखविले. त्यासाठी मला आई-वडील, भाऊ पवन पाटील, भवानी फाउंडेशनचे अध्यक्ष हर्षेल सुर्वे, चैतन्य अष्टेकर, प्रदीप हांडे, राकेश सावंत यांंचे पाठबळ, तर सीपीआर, महापालिका आणि जिल्हा प्रशासनाचे सहकार्य लाभले असल्याचे प्रिया हिने सांगितले.
कोणतेही क्षेत्र असू दे त्यामध्ये महिलांनी जिद्दीने कार्यरत राहावे. काहीवेळा टीका होईल; पण त्याकडे दुर्लक्ष करून उत्कृष्ट कामगिरी करावी. चांगल्या कामगिरीची समाज निश्चितपणे दखल घेतो. कोरोनाच्या तिसऱ्या लाटेला दूर ठेवण्यासाठी सर्वांनी आवश्यक ती काळजी घ्यावी. -प्रिया पाटील