Nawab Malik Arrested : नवाब मलिक यांच्या अटकेने राज्यात राजकारण तापले; राजीनामा घेण्यासाठी भाजप आक्रमक

By ऑनलाइन लोकमत | Published: February 24, 2022 05:48 AM2022-02-24T05:48:49+5:302022-02-24T05:49:59+5:30

Nawab Malik Arrested : मुख्यमंत्री ठाकरे यांनी मलिक यांच्या मंत्रिपदाचा तातडीने राजीनामा घ्यावा, अन्यथा राज्यभर आंदोलन करण्यात येईल, असा इशारा भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी दिला आहे.

Nawab Malik Arrested Arrest of Nawab Malik heats up politics in the maharashtra BJP aggressive to resign | Nawab Malik Arrested : नवाब मलिक यांच्या अटकेने राज्यात राजकारण तापले; राजीनामा घेण्यासाठी भाजप आक्रमक

Nawab Malik Arrested : नवाब मलिक यांच्या अटकेने राज्यात राजकारण तापले; राजीनामा घेण्यासाठी भाजप आक्रमक

Next

Nawab Malik Arrested : अल्पसंख्याक मंत्री आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसचे मुख्य प्रवक्ते नवाब मलिक यांना अटक झाल्यानंतर राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. मलिक यांना अटक झाल्यानंतर भाजप चांगलेच आक्रमक झाले आहे.  मुख्यमंत्री ठाकरे यांनी मलिक यांच्या मंत्रिपदाचा तातडीने राजीनामा घ्यावा, अन्यथा राज्यभर आंदोलन करण्यात येईल, असा इशारा भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी दिला आहे.

दुसरीकडे मलिक यांची पाठराखण करण्यासाठी महाविकास आघाडी पुढे सरसावली असून कसल्याही परिस्थितीत मंत्रिपदाचा राजीनामा घ्यायचा नाही, असा पवित्रा घेत या कारवाईविरोधात राज्यभर आंदोलन करीत जनतेच्या दरबारात जाण्याचा इशारा आघाडीने दिला आहे. शरद पवार, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस या तपास यंत्रणांवर दबाव का आणत आहेत? त्यांची बदनामी का करीत आहेत? असा सवाल करीत भाजप नेते आ. आशिष शेलार यांनी ‘नवाब बेनकाब हो गया है’, असे म्हटले आहे.

ईडीवाले तोंडात देणार विडी - राणे
मलिक यांच्याबाबतीत जे घडले ते कधीतरी होणारच होते. आता ‘डी’ आणि ‘ए’ की आणखी काही गँगशी त्यांचे संबंध आहेत, ते उघड होतील. मलिकांचे अनुकरण कोणी करू नये. आता काय ते बोला म्हणावे त्यांना ईडीसमोर, नाही तर तोंडात विडी देणार ते ईडीवाले, अशी टिपण्णी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी केली.

लोकशाहीविरोधी कारवाई - गृहमंत्री
मलिक यांना अशा प्रकारे ईडीच्या कार्यालयात घेऊन जाणे लोकशाहीच्या आणि सामान्य माणसाच्या हक्कांच्या विरोधात आहे. केंद्रीय यंत्रणांनी कारवाई करण्याआधी कोणीतरी टीव्ही किंवा ट्विटच्या माध्यमातून माहिती प्रसारित करीत असतो. याचा अर्थ हे सर्व ठरवून केले जात आहे, असे गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी म्हटले आहे.

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी नोव्हेंबर २०२१ मध्ये मंत्री नवाब मलिक यांच्यावर केलेले आरोप 

  • नवाब मलिक यांच्या कंपनीने  १९९३च्या मुंबई बॉम्बस्फोटातील आरोपी सरदार शाह वली खान, मोहम्मद सलीम पटेल यांच्याकडून जमीन खरेदी केल्याचे म्हटले. 
  • खान याला १९९३ला जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली होती. तो टायगर मेमनचा साथीदार होता तसेच बॉम्बे स्टॉक एक्स्चेंज, मुंबई महापालिकेत बॉम्ब कुठे ठेवायचा, याची रेकी त्याने केली होती. त्यानेच टायगर मेमनच्या वाहनात आरडीएक्स लोड केले होते. 
  • दुसरी व्यक्ती मोहम्मद सलीम पटेल आहे, जो दाऊद इब्राहिमचा जवळचा असून, तो हसीना पारकरचा ड्रायव्हर, बॉडीगार्ड असल्याचे सांगितले होते. तसेच, नवाब मलिकचे अंडरवर्ल्डशी संबंध असून, दिवाळीनंतर बॉम्बस्फोट करणार असल्याचे फडणवीस यांनी म्हटले होते.  
  • पुढे हे पुरावेदेखील ईडीकडे सादर केले. कुर्ल्यातील एलबीएस रोडवरील गोवावाला कंपाउंड येथे असलेली तीन एकर जमीन केवळ २० ते ३० लाखांना विकली गेली, तर त्याचा बाजारभाव साडेतीन ते पाच कोटी असल्याचा आरोप होता.

    मंत्री नवाब मलिक यांनी त्यांच्यावरील आरोप पत्रकार परिषद घेत फेटाळले होते. मलिक म्हणाले हाेते - 
  • दीड लाख फूट जमीन कवडीमोल भावात माफियांकडून खरेदी केल्याचा आरोप आहे. पण प्रत्यक्षात तिथे एक को-ऑपरेटिव्ह सोसायटी आहे. 
  • जी १९८४ मध्ये स्थापन झाली होती. याला गोवावाला कंपाैंड म्हणतात. मुनिरा पटेल यांच्याकडून विकास हक्क घेऊन रस्सीवाला यांनी त्यावर घरे बांधून विकली होती. त्याच्या मागे आमचे गोदाम आहे. ते मुनिरा यांच्याकडून भाडेतत्त्वावर घेतले होते. 
  • तिथे आमची चार दुकाने होती. मुनिरा पटेल यांनी सलीम पटेल यांना पॉवर ऑफ ॲटर्नीचे अधिकार दिले होते, आम्ही त्यांच्याकडून भाडेतत्त्वावर घेतलेल्या गोदामाची मालकी घेतली. त्यावेळी जी किंमत होती, तीच देण्यात आली. 
  • आम्ही मालकिणीकडून जमीन घेतली, मालकीण म्हणाली की, सलीम पटेल हे माझे पॉवर ऑफ ॲटर्नी आहेत, यांच्यासोबत सर्व व्यवहार करा. त्यानुसार व्यवहार झाल्याचे त्यांनी नमूद केले होते. ईडीकडून याच मालमत्तेच्या खरेदी व्यवहारप्रकरणी अटकेची कारवाई करण्यात आली आहे.


‘कायद्यात तरतूद नसली तरी नैतिकतेच्या आधारे राजीनामा अभिप्रेत’
नेत्यांनी त्यांच्या पदावरून राजीनामा देण्यासंदर्भात कायद्यात तरतूद नसली तरी त्यांनी नैतिकतेच्या आधारावर पदावरून राजीनामा द्यावा, असे अभिप्रेत आहे. अन्यथा कारागृहातूनही कामकाज सांभाळता येते. तशी उदाहरणे आहेत. लालुप्रसाद यादव, छगन भजुबळ व आणखी काही जणांनी राजीनामा न देता कारागृहातूनच कामकाज सांभाळले आहे. आता नवाब मलिक यांना ईडी कोठडी सुनावण्यात आली आहे. जर त्यांच्या दृष्टीने ती बेकायदेशीर असेल तर उच्च न्यायालयात याचिका दाखल करू शकतात, अन्यथा विशेष न्यायालयात नेहमीची प्रक्रिया पार पडेल. ईडी कोठडी संपल्यावर पुन्हा एकदा कदाचित ईडी त्यांचा ताबा मागेल किंवा मागणार नाही. जर ईडीने त्यांचा ताबा मागितला तर मलिकांचे वकील त्याचा विरोध करणे स्वाभाविक आहे. 
ॲड. उदय वारुंजीकर

३ फेब्रुवारीला एनआयएने दाऊद विरोधात गुन्हा दाखल 
३ फेब्रुवारीला एनआयएने दाऊद विरोधात गुन्हा दाखल केला. मनी लॉन्ड्रिंग, ड्रग्ज तस्करी तसेच अन्य गुन्ह्यांत दाऊदचा सहभाग आहे, असे ईडीचे एएसजी अनिल सिंग यांनी न्यायालयात सांगितले. तसेच, मलिक आणि दाऊद यांच्यात कसे संबंध आहेत, हे देखील त्यांनी न्यायालयात सांगितले. 

दाऊद इब्राहिमची बहीण हसीना पारकर दाऊदचा कारभार पाहत होती. तिच्याकडून मलिक यांनी दाऊदची बेनामी संपत्ती विकत घेतल्याचा आरोप करण्यात आला आहे. दाऊदची २०० कोटी रुपयांची संपत्ती कमी किमतीत विकत घेतली. हा व्यवहार रोखीने झाला. त्यात ५५ लाखांचा व्यवहार झाला. मलिक यांच्या कुटुंबाच्या एका कंपनीकडे या संपत्तीची मालकी आहे. या कंपनीवर मलिक यांचा मुलगा संचालक आहे. काहीकाळ ही कंपनी मलिक यांच्या नियंत्रणाखाली होती, असा आरोप सिंग यांनी कोर्टात केला. इतकेच नाही तर कुर्ल्यातील मालमत्ता मरियम आणि मुनिरा या दोघींच्या नावावर करण्यात आली होती. ही जमीन मुळात दाऊद गँगच्या हस्तकांशी संबंधित होती. ही जमीन १९९३ च्या बॉम्ब स्फोटातील आरोपी सलीम पटेलची होती आणि तो अंडरवर्ल्डशी संबंधित होता. ती संपत्ती आता मलिक यांच्या कंपनीकडे आहे, असेही सिंग यांनी न्यायालयात सांगितले आहे.

Web Title: Nawab Malik Arrested Arrest of Nawab Malik heats up politics in the maharashtra BJP aggressive to resign

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.