Nawab Malik on NCB: 'समीर वानखेडेंसाठी भाजप नेत्यांचं दिल्लीत लॉबिंग'; नवाब मलिकांचा गंभीर आरोप
By ऑनलाइन लोकमत | Published: January 2, 2022 12:36 PM2022-01-02T12:36:42+5:302022-01-02T12:44:48+5:30
'याबाबत चौकशीसाठी मी स्वत:पत्र लिहिणार, न्यायालयासमोर हा विषय घेऊन जाणार.ट
मुंबई: क्रूज ड्रग्ज पार्टी प्रकरणापासून सुरू झालेलं नवाब मलिक (Nawab Malik) विरुद्ध मुंबई एनसीबी (NCB) युद्ध अजून संपलेलं नाही. नवाब मलिक सातत्याने एनसीबी आणि समीर वानखेडेंवर (Sameer Wankhede) टीका करत आहेत. आजही मलिकांनी पत्रकार परिषद घेऊन भाजप आणि एनसीबीवर टीका केली. तसेच, समीर वानखेंडेंना पदावर कायम ठेवण्यासाठी भाजप नेते दिल्लीत लॉबिंग करत असल्याचा आरोप केला.
'वसुली गँगमध्ये भाजपचा सहभाग?'
नवाब मलिक म्हणाले की, एका आठवड्यापासून बातम्या पेरण्यात येत आहेत की, समीर वानखेडे एक्सटेन्शन घेणार नाहीत. पण मला मिळालेल्या माहितीनुसार, त्यांना मुदतवाढ मिळावी म्हणून भाजपचे महाराष्ट्रातील बडे नेते दिल्लीत लॉबिंग करत आहेत. सर्व बेकायदेशीर कामे या अधिकाऱ्यांनी केल्याचे रिपोर्ट असतानाही भाजपचे नेते समीर वानखेडेंना मुंबईत ठेवण्यात उत्सुक आहेत. म्हणजे वसुली गँगमध्ये त्यांचा सहभाग आहे का? असा खोचक सवाल मलिकांनी यावेळी केला.
Addressing the Press Conference. https://t.co/WNeQDVEuKu
— Nawab Malik نواب ملک नवाब मलिक (@nawabmalikncp) January 2, 2022
'न्यायालयात हा विषय घेऊन जाणार'
31 तारखेला एक्स्टेन्शन संपल्यानंतर त्यांना रिलीव्ह का केलं गेलं नाही? किंवा ते एक्सटेंड का नाही केलं गेलं? यावर निर्णय का प्रलंबित आहे? माझी माहिती आहे की भाजपाचे मोठे नेते गृहमंत्रालयात लॉबिंग करत आहेत. असू द्या...वानखेडेंना इथे ठेवले, तर चांगलंच होईल. त्यांचा फर्जीवाडा बाहेर काढण्याची आम्हाला संधी मिळेल. पण ज्या पद्धतीने इतकं होऊनही हे अधिकारी पंचनामा बदलण्यात व्यस्त आहेत, निश्चित रुपाने याबाबत चौकशीसाठी मी स्वत:पत्र लिहिणार आहे. न्यायालयासमोर हा विषय घेऊन जाईल. यांच्या विरोधात आणखी काही पुरावे आहेत त्याबाबत टप्प्याटप्प्याने भविष्यात सांगेन.
'एनसीबीमध्ये मोठा भ्रष्टाचार'
मलिक पुढे म्हणाले, एनसीबीचा फर्जीवाडा अजूनही सुरुच आहे. 2021 मध्ये NCB ने खोटे आरोप दाखल केले जात होते, मोठ्या प्रमाणात पैसे वसूल केले जात होते. क्रुझवरील रेडनंतर अनेक प्रकरणं पुढे आली. एनसीबीमध्ये मोठा भ्रष्टाचार होत आहे. मागील तारखांच्या पंचनाम्यावर सही केली जात आहे, असा आरोप त्यांनी केला. मॅडी नावाचा एनसीबीचा एक पंच आहे त्याला बाबू नावाचा एक अधिकारी पंचनामा बॅक डेटडवर सही करण्यासाठी सांगत आहे. त्यानंतर घाबरलेला पंच समीर वानखेडेंना फोन करुन विचारतो तेव्हा समीर वानखेडे सांगतात की, सही करा काही होणार नाही.
मलिकांकडून ऑडिओ क्लिप जारी
2 ऑक्टोबर 2021 क्रुझ रेड प्रकरणात एनसीबीचा फर्जीवाडा अजूनही सुरू आहे. एनसीबीचे अधिकारी अडचणीत येणार हे लक्षात येताच पंचनामे बदलण्याचे काम सुरू आहे. यावेळी, कथित संभाषणाची क्लिप ऐकवत नवाब मलिकांनी समीर वानखेडेंवर निशाणा साधला आहे. एसआयटी समीर वानखेडे आणि बाबू नावाच्या अधिकाऱ्यावर कारवाई करणार का? असा सवालही नवाब मलिकांनी विचारला आहे.