ईडीनं अटक केलेल्या मंत्री नवाब मलिकांची संपत्ती नेमकी किती? जाणून घ्या...
By ऑनलाइन लोकमत | Published: February 23, 2022 08:19 PM2022-02-23T20:19:46+5:302022-02-23T20:20:12+5:30
नवाब मलिक यांच्या संपत्तीबाबत अनेक सवाल उपस्थित केले जात आहेत. नवाब मलिक यांनी त्यांच्या प्रतिज्ञापत्रात नमूद केलेल्या माहितीनुसार त्यांची एकूण संपत्ती किती याची माहिती पुढीलप्रमाणे...
राज्याचे अल्पसंख्याक मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांना आज सक्तवसुली संचालनानयानं (ईडी) अटक केली आहे. समोर आलेल्या माहितीनुसार मुंबई बॉम्बस्फोटातील आरोपी आणि कुख्याद गुंड दाऊद इब्राहिम याच्याशी संबंधित व्यक्तींशी आर्थिक व्यवहार केल्याच्या आरोपाखाली त्यांना अटक करण्यात आल्याची माहिती समोर आली. नवाब मलिक यांना अटक करण्यात आल्यानंतर त्यांच्या संपत्तीबाबतची चर्चा सुरू झाली आहे. त्यांच्या अटकेनंतर सोशल मीडियातही वेगवेगळ्या चर्चा केल्या जात आहेत. नवाब मलिक यांच्या संपत्तीबाबत अनेक सवाल उपस्थित केले जात आहेत. नवाब मलिक यांनी त्यांच्या प्रतिज्ञापत्रात नमूद केलेल्या माहितीनुसार त्यांची एकूण संपत्ती किती याची माहिती पुढीलप्रमाणे...
नवाब मलिकांनी एकूण संपत्ती किती?
- मंत्री नवाब मलिक यांनी २०१९ मध्ये निवडणूक आयोगासमोर सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रानुसार त्यांच्याकडे ४ लाख ५४ हजार रुपये रोख आहेत असं म्हटलं होतं. तसंच त्यांच्या पत्नीकडे ९७,२३२ रुपये रोख आहेत. बँकेतील जमा रकमेबाबत बोलायचं झालं तर नवाब मलिक यांचा बँक बॅलन्स सुमारे ५ लाख ३ हजार रुपये आहे. तर पत्नीच्या खात्यात १ लाख ९२ हजार रुपये असल्याचं म्हटलं होतं.
- नवाब मलिक यांच्याकडे 35,231 रुपयांचे गुंतवणूक रोखे आणि पत्नीच्या नावे 1 कोटी 13 लाख रुपयांचे रोखे आहेत. याशिवाय ५ लाखांची एलआयसी आहे.
- नवाब मलिक यांच्यावर 15,16,233 रुपये कर्ज असून त्यांच्याकडे 7 लाख रुपयांची वाहने आणि पत्नीकडे 4 लाख रुपयांची मालमत्ता आहे. त्यांच्या पत्नीकडे 32 लाख 43 हजार रुपयांची संपत्ती आहे. अशा स्थितीत नवाब मलिक यांच्याकडे 37 लाख 7 हजार रुपयांची तर त्यांच्या पत्नीकडे 1 कोटी 53 लाख रुपयांची संपत्ती आहे.
- घर, जमीन इत्यादीबद्दल बोलायचे झाले तर नवाब मलिक यांच्याकडे 1 कोटी 14 लाख रुपये आहेत. तर त्यांच्या पत्नीकडे 2 कोटी 70 लाख रुपयांची स्थावर मालमत्ता आहे.
- नवाब मलिक यांच्यावर 19 लाख 49 हजार रुपये तर त्यांच्या पत्नीवर 25 लाख 81 हजार रुपयांचे कर्ज आहे.
कमाई किती?
प्रतिज्ञापत्रानुसार, 2018-19 मध्ये त्यांनी 10 लाख 90 हजार रुपये कमावले होते. यापूर्वी 2017-18 मध्ये 11 लाख 83 हजार, 2016-17 मध्ये 2 लाख 13 हजार, 2015-16 मध्ये 6 लाख 14 हजार रुपयांचे उत्पन्न मिळाले होते.
ईडीच्या आठ तासांच्या चौकशीनंतर नवाब मलिक दक्षिण मुंबईतील ईडी कार्यालयातून बाहेर येताच मोठ्या संख्येने जमलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी 'झुंगे नही झुंगे नही'च्या घोषणा देण्यास सुरुवात केली होती. नवाब मलिक यांनीही झुकणार नाही, लढणार आणि जिंकणारच, असा इशारा देत हात हलवत कार्यकर्त्यांना इशारा केला. सध्या नवाब मलिक यांना मुंबईतील जेजे रुग्णालयात वैद्यकीय तपासणीसाठी आणण्यात आले. वैद्यकीय तपासणीनंतर त्याला न्यायालयात हजर करून त्याच्या कोठडीची मागणी करण्यात आली आहे.