अमित शहा जनरल डायरपेक्षा कमी नाहीत: नवाब मलिक
By ऑनलाइन लोकमत | Published: December 18, 2019 05:12 PM2019-12-18T17:12:28+5:302019-12-18T17:15:40+5:30
राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांनी नागरिकत्व दुरुस्ती कायद्यावरून अमित शहा यांच्यावर निशाणा साधला आहे
मुंबई: जामिया विद्यापीठात झालेल्या घटनेवर बोलताना, जालियनवाला बाग हत्याकांडासारखं वातावरण देशात निर्माण केलं जातंय का, याची शंका उपस्थित होत असल्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे मंगळावरी म्हणाले होते. तर आता राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिका यांनी सुद्धा अमित शहा जनरल डायरपेक्षा काही कमी नसल्याची टीका केल्याने नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.
नागरिकत्व दुरुस्ती कायद्याविरोधात देशभरात आंदोलने केली जात आहे. तर याचे राजकीय पडसाद सुद्धा उमटताना पाहायला मिळत आहे. सर्वच विरोधक या मुद्यावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा आणि भाजपवर टीका करताना पाहायला मिळत आहे. तर महाराष्ट्राच्या राजकरणात सुद्धा याच मुद्यावरून आरोप-प्रत्यारोप सुरु झाली आहेत.
तर राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांनी नागरिकत्व दुरुस्ती कायद्यावरून अमित शहा यांच्यावर निशाणा साधला आहे. ज्या प्रकारे जालियानवाला बागेत जनरल डायरनं लोकांवर गोळीबार केला होता, त्याचप्रकारे अमित शहा हेही देशातील लोकांवर गोळ्या झाडण्याचे आदेश देत आहेत. अमित शहा हे जनरल डायरपेक्षा काही कमी नाहीत, अशी टीका मलिक यांनी केली आहे. त्यांच्या या विधानामुळे नवीन वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे.
विशेष म्हणजे याआधी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सुद्धा जामिया विद्यापीठातल्या परिस्थितीवरुन मोदी सरकारला लक्ष्य केले होते. देशात आणि राज्यात अस्थिरतेचं, अशांततेचं वातावरण निर्माण केलं जात आहे. दिल्लीच्या विद्यापीठ परिसरात विद्यार्थ्यांवर गोळीबार केला गेला. त्यामुळे जालियनवाला बाग हत्याकांडासारखं वातावरण देशात निर्माण केलं जातंय का, याची शंका उपस्थित असल्याचे उद्धव म्हणाले होते. तर आज पुन्हा मालिकांनी अमित शहा यांची तुलना जनरल डायरशी केली आहे