नवाब मलिक, संजय पांडे आणि संजय राऊत; आता पुढचं कोण?, मोहित कंबोज यांच्या ट्वीटची चर्चा
By ऑनलाइन लोकमत | Published: August 1, 2022 08:45 AM2022-08-01T08:45:13+5:302022-08-01T08:45:47+5:30
पत्राचाळ पुनर्विकासात झालेल्या आर्थिक घोटाळ्याप्रकरणी शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत चांगलेच अडचणीत आले आहेत.
पत्राचाळ पुनर्विकासात झालेल्या आर्थिक घोटाळ्याप्रकरणी शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत चांगलेच अडचणीत आले असून, रविवारी सकाळी ७ वाजता ईडीच्या अधिकाऱ्यांनी अचानक त्यांच्या भांडूप येथील घरी छापा टाकला. ते चौकशीत सहकार्य करत नसल्याचे सांगत सायंकाळी पावणेसहाच्या दरम्यान राऊत यांना ईडीने बॅलॉर्ड इस्टेट येथील कार्यालयात चौकशीसाठी आणले. रात्री उशिरापर्यंत चौकशी सुरु होती. यानंतर त्यांना मध्यरात्री अटक करण्यात आली. या कारवाईदरम्यान भाजपचे नेते मोहित कंबोज यांनी केलेल्या ट्वीटची सध्या चर्चा सुरू आहे.
“संजय राऊत यांना अटक. नवाब मलिक, संजय पांडे आणि संजय राऊत. आता पुढचं कोण?,” असं ट्वीट मोहित कंबोज यांनी केलं आहे. यासोबत त्यांनी सलीम जावेद यांची भेट झाली असंही म्हटलं आहे. यापूर्वी त्यांनी सलिम जावेद यांची जोडी गजाआड करणार असल्याचं वक्तव्यही केलं होतं.
Sanjay Raut Arrested .
— Mohit Kamboj Bharatiya (@mohitbharatiya_) July 31, 2022
Nawab Malik - Sanjay Panday NOW Sanjay Raut !
Who Is Next ?
दरम्यान, रात्री मोहित कंबोज आणि अस्लम शेख यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. या भेटीपूर्वीचा व्हिडीओही समोर आला होता. यावर त्यांनी स्पष्टीकरण दिलं आहे. शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांना ताब्यात घेतल्यानंतर नाही तर माझा वाढदिवस होता म्हणून मी भेटलो असल्याचंही त्यांनी सांगितलं.
...हा तर गळा घोटण्याचा डाव
संजय राऊत यांच्यावरील कारवाई हा लोकशाहीचा, विरोधकांचा गळा घोटण्याचा प्रयत्न आहे. हे कारस्थान लज्जा सोडून आहे. जो हिंदूंचा, मराठी माणसाचा आणि शिवसेनेचा आवाज बुलंद करतोय, त्याचाच गळा घोटण्याचा डाव आहे. शेवटच्या क्षणापर्यंत या जुलूमशाहीविरोधात लढत राहू आणि महाराष्ट्राची माती काय असते, तिथला पराक्रम काय असतो, हे दाखवून देऊ.
उद्धव ठाकरे, पक्षप्रमुख, शिवसेना