भाजपवरील खोट्या आरोपांबाद्दल नवाब मलिक यांनी जनतेची माफी मागावी; प्रसाद लाड यांची मागणी
By ऑनलाइन लोकमत | Published: April 20, 2021 07:33 PM2021-04-20T19:33:27+5:302021-04-20T19:35:17+5:30
भाजपकडून देण्यात येणाऱ्या रेमडेसिवीरचा पुरवठा राज्य सरकारमार्फतच केला जाणार होता : प्रसाद लाड
"दमण येथील ब्रुक फार्मा कंपनीतील 'रेमडेसिवीर'चा साठा भारतीय जनता पार्टीचे नेते राज्य सरकारच्याच ताब्यात देणार होते असा खुलासा अन्न व औषध प्रशासन मंत्री राजेंद्र शिंगणे यांनी केल्याने अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांचा खोटेपणा उघड झाला आहे. या खोटेपणाबद्दल मलिक यांनी महाराष्ट्राची माफी मागावी आणि राष्ट्रवादी चे प्रमुख शरद पवार यांनी खोटे आरोप करणाऱ्या मलिक यांच्यावर कारवाई करावी," अशी मागणी भाजप प्रदेश उपाध्यक्ष आ. प्रसाद लाड यांनी मंगळवारी केली. रेमडेसिवीर औषधांच्या साठेबाजीची सीबीआयकडून चौकशी करा, अशी मागणीही लाड यांनी यावेळी केली. मुंबईत आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
"भाजपकडून जो ५० हजार रेमडेसिवीर औषधाचा पुरवठा राज्य सरकारच्या मार्फतच केला जाणार होता असे अन्न व औषध प्रशासन खात्याचे मंत्री शिंगणे यांनी जाहीरपणे सांगितले आहे. नवाब मलिक यांनी जनतेची दिशाभूल करण्यासाठी केंद्र सरकार व भाजपाच्या नेत्यांविरूद्ध जे आरोप केले, ज्या अफवा पसरवल्या त्याबद्दल त्यांनी माफी मागावी," असं लाड यावेळी म्हणाले.
अशोक चव्हाणांच्या मागणीला पाठिंबा
राज्यामध्ये रेमडेसिवीर औषधांचा मोठ्या प्रमाणावर काळाबाजार झाला आहे. राज्य सरकारला हा काळाबाजार रोखता आला नसल्याने जनतेची ससेहोलपट होत आहे. त्यामुळे या औषधाच्या साठेबाजीची व काळ्याबाजारातील विक्रीची सीबीआय चौकशी करावी अशी मागणी आपण केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे पत्राद्वारे केली असल्याचंही लाड यांनी नमूद केलं. "राज्य सरकारच्या विविध यंत्रणा, महानगरपालिका, जिल्हा स्तरावरील यंत्रणांना रेमडिसीवरचा काळाबाजार रोखता आलेला नाही. आघाडी सरकारमधील ज्येष्ठ मंत्री व माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी एनआयए अथवा सीबीआय मार्फत या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी केली आहे. चव्हाण यांच्या या मागणीला आपला पूर्ण पाठिंबा आहे. अशी चौकशी झाल्यास या प्रकरणातले सत्य बाहेर येईल," असं त्यांनी नमूद केलं.
भाजप राज्य सरकारमार्फतच मदत करणार
"भारतीय जनता पक्षानं संकटाच्या काळात नेहमी जनतेच्या कल्याणाचा विचार केला. भाजपाकडून औषधांची जी मदत केली जाणार आहे ती राज्य सरकारच्या मार्फतच केली जाणार आहे. परस्पर नाही. राष्ट्रवादीच्या आमदारांनी पवार चॅरीटेबल ट्रस्टच्या माध्यमातून या औषधांचा पुरवठा केला. स्थानिक पातळीवर सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेसच्या लोकप्रतिनिधींकडून परस्पर औषधांचा पुरवठा केला आहे. मग हा औषधांचा साठा कुठून आला? या लोकप्रतिनिधींना औषधे पुरवण्याची परवानगी कोणी दिली?," असा सवालही लाड यांनी केला.