नवाब मलिक यांचा देवेंद्र फडणवीसांविरोधात पुन्हा घणाघात, केले अजून गंभीर आरोप, माफी मागण्याचीही केली मागणी
By ऑनलाइन लोकमत | Published: November 2, 2021 09:45 AM2021-11-02T09:45:51+5:302021-11-02T09:47:08+5:30
Nawab Malik News: महाविकास आघाडी सरकारमधील मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी आज पुन्हा एकदा समीर वानखेडे आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर घणाघाती आरोप केले आहेत.
मुंबई - महाविकास आघाडी सरकारमधील मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी आज पुन्हा एकदा समीर वानखेडे आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर घणाघाती आरोप केले आहेत. माझ्या जावयाच्या घरात ड्रग्स सापडल्याचा खोटा आरोप देवेंद्र फडणवीस यांनी केला. त्याबाबत फडणवीस यांनी माफी मागितली पाहिजे. तसेच दिवाळीनंतर बॉम्ब फोडण्याचा इशारा फडणवीस यांनी दिला आहे. मात्र जर त्यांना अशी माहिती असेल तर त्यांनी ते मुख्यमंत्रिपदी असताना आणि गृहमंत्रीपदाची जबाबदारी त्यांच्याकडे असताना त्यांनी का कारवाई केली नाही, असा सवालही मलिक यांनी उपस्थित केला.
आज प्रसारमाध्यमांशी बोलताना नवाब मलिक यांनी त्यांच्यावर टीका करणाऱ्या भाजपाच्या नेत्यांवर घणाघाती टीका केली. ते म्हणाले की, गेल्या २६ दिवसांमध्ये मी दोन महिलांशिवाय कुठल्याही महिलांची नावे घेतलेली नाही. त्या दोन महिलांची नावे घेतली कारण त्यांचा या प्रकरणाशी थेट संबंध आहे. आमच्यावर महिलांवर आरोप करतो म्हणून करतात. मात्र यांच्या घरातील महिला आई, बहिणी आणि इतरांच्या आई बहिणी या आई बहिणी नाहीत का? काल सोमय्यांना अजित पवारांच्या कुटुंबातील महिलांचा उल्लेख केला. संजय राऊत, एकनाथ खडसेंच्या पत्नीलाही बोलावले गेले. उद्धव ठाकरेंच्या पत्नीवर गंभीर आरोप केला गेला, त्याला काय म्हणायचं.
देवेंद्र फडणवीस यांनी काल नवाब मलिक यांच्या जावयाच्या घरातून गांजा सापडल्याचा आरोप केला. मात्र ही बाब खोटी आहे. येथील पंचनामा मागवा म्हणजे तुम्हाला सत्य काय आहे ते दिसेल. माझ्या जावयाच्या घरातून ड्रग्ससारखी एकही आक्षेपार्ह वस्तू जप्त झालेली नाही. त्यामुळे फडणवीस यांनी याबाबत माफी मागितली पाहिजे, अशी मागणी नवाब मलिक यांनी केली.
दिवाळीनंतर बॉम्ब फोडण्याचा इशारा दिला आहे. माझे अंडरवर्ल्डशी संबंध असल्याचा आरोप फडणवीस यांनी केला आहे. मात्र माझी ६२ वर्षे मुंबईत गेली आहे. असा आरोप करण्याची कुणाची हिंमत झालेली नाही. माझं घर काचेचं नाही. तसेच माझ्याकडे कुठला शिशमहलही नाही. त्यामुळे मी घाबरत नाही. बाकी तुम्ही पाच वर्षे मुख्यमंत्री होता. तेव्हा गृहमंत्रालयही तुमच्याकडे होते. तेव्हा अशा प्रकरणाचा तपास का केला नाही असा सवालही नवाब मलिक यांनी विचारला.
फडणवीस मुख्यमंत्री असताना एक नकली देवेंद्र शहरात फिरत होता, तेव्हा मी फडणवीसांना खबरदारीचा सल्ला दिला होता. त्याकाळा ४ सिझन हॉटेलमध्ये मोठ्या पार्ट्या व्हायच्या. त्यात एका टेबलची किंमत १५ लाख होती. १५ कोटींच्या पार्ट्या व्हायच्या. त्या काळातले सीसीटीव्ही मी जारी केले असते तर तोंड दाखवायला जागा राहिली नसती. समझदार को इशारा काफी है, असा इशारा नवाब मलिक यांनी दिला.