"हिंमत होती म्हणून लढलो, तुमच्यासारखे पक्ष सोडून केंद्रीय मंत्री झालो नाही", नारायण राणे यांच्यावर नवाब मलिक यांचा हल्लाबोल
By ऑनलाइन लोकमत | Published: August 30, 2021 11:40 AM2021-08-30T11:40:54+5:302021-08-30T11:41:53+5:30
Nawab Malik : भाजपा जनतेला धोका देत आहे. लोकांची दिशाभूल करत आहे, असा आरोपही नवाब मलिक यांनी केला.
मुंबई: राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक (Nawab Malik)यांनी केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांच्यावर निशाणा साधला आहे. आमच्यात हिंमत होती म्हणून आम्ही लढलो. तुमच्यासारखे पक्ष सोडून केंद्रीय मंत्री झालो नाहीत, असा हल्लाबोल नवाब मलिक यांनी केला आहे. सोमवारी नवाब मलिक यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते बोलत होते.
भाजपा केंद्रीय यंत्रणांचा दुरुपयोग करत आहे. त्यामुळेच ज्यांच्यात हिंमत नाही ते पक्ष सोडून भाजपामध्ये जात आहेत. भाजपा बेजबाबदारपणे कृत्य करत आहे, अशी टीका नवाब मलिक यांनी केली. तसेच, नवाब मलिक यांनी थेट नारायण राणेंना लक्ष्य केले. आमच्यात हिंमत होती म्हणून आम्ही लढलो. कायदेशीर लढा जो आहे, तो लढावा लागेल. पण आम्ही तुमच्यासारखे पक्ष सोडून आलो नाही. तुमच्यासारखे केंद्रीय मंत्री झालो नाहीत, अशा शब्दांत नवाब मलिक यांनी हल्लाबोल केला.
याचबरोबर, राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांना ईडीची नोटीस आली आहे. त्यावरही नवाब मलिक यांनी भाष्य केले. ईडीची नोटीस येणे हे अपेक्षितच होते. राणेंना अटक झाल्यानंतर तर ते अपेक्षितच होते. अनिल परब यांना ईडीच्या माध्यमातून त्रास दिला जाईल. सूडबुद्धीने हे राजकारण सुरू आहे. याबाबत आता लोकांच्या मनात कसलीच शंका उरली नाही, असे नवाब मलिक म्हणाले.
भाजपा जनतेला धोका देतंय - नवाब मलिक
राज्यातील मंदिरं उघडण्यासाठी भाजपाकडून राज्यभरात आंदोलन केले जात आहे. पुण्यातील कसबा मंदिराच्या समोर भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत आंदोलन सुरू आहे. या आंदोलनावरही नवाब मलिक यांनी टीका केली. कोविडचा धोका आहे, हे जनतेला कळत आहे. मोदी साहेब स्वत: सांगत आहेत तरी हे लोक ऐकत नाहीत. भाजपा जनतेला धोका देत आहे. लोकांची दिशाभूल करत आहे, असा आरोपही नवाब मलिक यांनी केला.