Exclusive: 'जावयावरील कारवाईमुळे वानखेडेंवर आरोप करत आहात?' नवाब मलिक म्हणाले...
By ऑनलाइन लोकमत | Published: October 29, 2021 03:42 PM2021-10-29T15:42:39+5:302021-10-29T16:44:09+5:30
'मी कधीच शाहरुख खानला भेटलो नाही, त्याच्या मुलाला वाचवण्यासाठी हे केलं नाही.'
मुंबई: क्रुज ड्रग्स पार्टी प्रकरणानंतर एनसीबी अधिकारी समीर वानखेडे(Sameer wankhede) यांचे नाव चांगलेच चर्चेत आले. पण, यानंतर महाराष्ट्र सरकारमधील मंत्री नवाब मलिक(Nawab Malik) यांनी त्यांच्यावर अनेक आरोप केले. मलिकांनी वानखेडेंवर बनावट कागदपत्र सादर करणे, लग्नासाठी धर्म बदलणे अशाप्रकारचे आरोप केले. यानंतर वानखेडे यांच्याकडून त्यांना स्पष्टीकरणही देण्यात आलं. या सर्व प्रकरणावर आज नवाब मलिक यांनी लोकमतशी सविस्तर चर्चा केली. यात त्यांनी अनेक महत्वाच्या मुद्द्यांवर भाष्य केलं.
माझ्या जावयाकडे हर्बल तंबाखू होती...
लोकमतशी बोलताना मलिकांना विचारण्यात आलं की, तुमच्या जावयावर कारवाई करुन तुरुंगात टाकलं म्हणून तुम्ही सुडबुद्धीने हे करताय? त्यावर नवाब मलिक म्हणाले, 'जावयावरील कारवाईमुळे सुड बुद्धीने मी हे करत नाहीये. मुळात माझ्या जावयाविरोधात रचलेल हे कटकारस्थान होतं. माझ्या जावयाने कधीच गांजाचा व्यवसाय केला नाही. जावयाच्या एका मित्राने हर्बल तंबाखुचा व्यवसाय सुरू केला होता. त्याने माझ्या जावयालाही त्या बिझनेसमध्ये येण्यास सांगितलं.'
'काही दिवसानंतर एनसीबीने जावयाला समन्स पाठवल्याच्या बातम्या माध्यमांवर पाहिल्या. हे समन पाठवल्यानंतर सर्व मीडिया माझ्या मागे लागला. याच्या काही दिवसानंतर जावयाला अटक करण्यात आली आणि त्याच्याकडे दोनशे किली गांजा असल्याच्या बातम्या समोर आल्या. पण, मुळात तो गांजा नव्हताच, ती हर्बल तंभाखू होती. जावयाला अटक झाल्यानंतर त्या तंबाखूचे नमुने प्रयोगशाळे पाठवले, त्यात हा गांजा नसल्याचे समोर आले', अशी माहिती मलिकांनी दिली.
एनसीबीच्या बोगस प्रकरणांची माहिती मिळाली
यानंतर मलिक म्हणाले की, काहीजण म्हणत आहे की, माझ्या सावयावर कारवाई केली म्हणून मी सुडाचं राजकारण करत आहे. पण, तसच नाहीये. मी त्या शाहरुख खानला(Shahrukh Khan) कधीच भेटलो नाही, त्याच्या मुलाला वाचवण्यासाठी हे करत नाहीये. समीर वानखेडेने माझ्या जावयावर चुकीच्या पद्धतीने कारवाई केली, तेव्हापासूनच मी एनसीबीच्या बोगस प्रकरणांबाबत माहिती घेत होतो. यातच हे आर्यन खानचे प्रकरण समोर आले, यालाही चुकीच्या पद्धतीने अडकवण्यात आले. फक्त आर्यन आणि माझा जावईच नाही, तर अनेक लोकांना अशा बोगस प्रकरणांमध्ये अडकवण्यात आलं आहे. या सर्व प्रकरणांचा अभ्यास केल्यानंतर मी वानखेडेविरोधात बोलणे सुरू केले, असंही ते म्हणाले.