मुंब्रा येथील मस्जिद ट्रस्टकडील जागा वाढीव दराने भाडेतत्वावर देण्यास मान्यता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 15, 2021 06:42 PM2021-06-15T18:42:03+5:302021-06-15T18:42:26+5:30
वक्फ मंडळाअंतर्गत नोंदणीकृत असलेल्या मुंब्रा (जि. ठाणे) येथील कौसा जामा मस्जिद ट्रस्ट यांच्याकडील जागा वाढीव दराने भाडेतत्वावर देण्यास शासनामार्फत आज मान्यता देण्यात आली असल्याची माहिती अल्पसंख्याक विकास आणि औकाफ विभागाचे मंत्री नवाब मलिक यांनी दिली.
मुंबई: वक्फ मंडळाअंतर्गत नोंदणीकृत असलेल्या मुंब्रा (जि. ठाणे) येथील कौसा जामा मस्जिद ट्रस्ट यांच्याकडील जागा वाढीव दराने भाडेतत्वावर देण्यास शासनामार्फत आज मान्यता देण्यात आली असल्याची माहिती अल्पसंख्याक विकास आणि औकाफ विभागाचे मंत्री नवाब मलिक यांनी दिली. यामुळे या ट्रस्टच्या उत्पन्नात भरीव वाढ होणार असून त्याचा तेथील अल्पसंख्याक मुस्लिम समाजाच्या सामाजिक, शैक्षणिक विकासासाठी लाभ होणार आहे, असे त्यांनी सांगितले.
मंत्री मलिक म्हणाले की, कौसा जामा मस्जिद ट्रस्टची मुंब्रा (जि. ठाणे) येथे २२१ गुंठे इतकी जागा आहे. या जागेला भाडेतत्वावर देण्यासाठी ट्रस्टने निविदा प्रक्रिया राबविली होती. वक्फ नियमानुसार जागेच्या रेडी रेकनर दराच्या किमान १ टक्के इतक्या रकमेइतके वार्षिक भाडे मिळायला हवे. ही रक्कम १४ लाख रुपये इतकी होती. तथापी, ही जागा भाडेतत्वावर देण्याच्या निविदा प्रक्रियेमध्ये खडावली एज्युकेशन सोसायटी यांनी सर्वाधिक दर सादर केला. त्यामुळे त्यांच्या निविदेस मान्यता मिळाली. या व्यवहारास वक्फ मंडळाने मान्यता दिली. आज यास शासनामार्फतही मान्यता देण्यात आली. यानुसार या भाडेकराराच्या माध्यमातून कौसा जामा मस्जिद ट्रस्टला वार्षिक २९ लाख ११ हजार १११ रुपये इतके भरीव भाडे प्राप्त होणार आहे. वक्फ नियमानुसार निर्धारित किमतीच्या जवळपास दुप्पट इतकी ही रक्कम असून यामुळे ट्रस्टच्या उत्पन्नात चांगली वाढ होणार आहे, असे मंत्री मलिक यांनी सांगितले.
राज्यातील वक्फ मंडळांतर्गत नोंदणीकृत असलेल्या इतर संस्था, ट्रस्ट यांनीही याच पद्धतीने पुढे येऊन आपल्या संस्थेच्या उत्पन्नात भरीव वाढ होईल यासाठी प्रयत्न करावेत. वाढीव उत्पन्नाचा उपयोग समाजाच्या सामाजिक, शैक्षणिक उन्नतीसाठी करावा. शासनाकडे येणाऱ्या अशा सर्व प्रस्तावांना मान्यता देण्यात येईल, असे मंत्री मलिक म्हणाले.