नवाब मलिक यांनी संजय राऊत यांना वाढदिवसाच्या शोलेस्टाईल शुभेच्छा, सोशल मीडियावर त्या ट्विटची चर्चा
By ऑनलाइन लोकमत | Published: November 15, 2021 12:55 PM2021-11-15T12:55:00+5:302021-11-15T12:55:31+5:30
Sanjay Raut Birthday: Shiv Sena नेते, खासदार संजय राऊत यांचा आज वाढदिवस आहे. सध्या महाराष्ट्र आणि मुंबईच्या राजकीय वर्तुळात Sanjay Raut यांच्याप्रमाणेच चर्चेचा विषय ठरलेले Nawab Malik यांनीही संजय राऊत यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
मुंबई - शिवसेना नेते, खासदार संजय राऊत यांचा आज वाढदिवस आहे. त्यानिमित्त संजय राऊत यांच्यावर विविध क्षेत्रातून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. दरम्यान, सध्या महाराष्ट्र आणि मुंबईच्या राजकीय वर्तुळात संजय राऊत यांच्याप्रमाणेच चर्चेचा विषय ठरलेले नवाब मलिक यांनीही संजय राऊत यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. मात्र नवाब मलिक यांनी संजय राऊत यांना दिलेल्या शुभेच्छा ह्या सोशल मीडियावर आणि राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरल्या आहेत.
नवाब मलिक यांनी ट्विट करून संजय राऊत यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. या ट्विटमध्ये नवाब मलिक यांनी शोले चित्रपटातील अजरामर ‘ये दोस्ती हम नहीं तोड़ेंगे’, या गाण्याचा उल्लेख करत मलिक यांनी संजय मलिक यांच्याशी असलेले आपले मैत्रिपूर्ण संबंध अधोरेखित करण्याचा प्रयत्न केला आहे. ‘ये दोस्ती हम नहीं तोड़ेंगे, तोड़ेंगे दम मगर, तेरा साथ ना छोडेंगे’, हॅप्पी बर्थ डे संजय राऊतजी, अशा शब्दात शुभेच्छा देत मलिक यांनी राऊत यांच्यासोबतची मैत्री कायम राहण्याची अपेक्षा व्यक्त केली आहे.
ये दोस्ती हम नहीं तोड़ेंगे,
— Nawab Malik نواب ملک नवाब मलिक (@nawabmalikncp) November 15, 2021
तोड़ेंगे दम मगर,
तेरा साथ ना छोडेंगे
Happy Birthday Sanjay Raut ji @rautsanjay61
गेल्या महिन्यामध्ये मुंबईत आलिशान क्रूझवर एनसीबीकडून झालेली कारवाई आणि त्यात आर्यन खानला झालेल्या अटकेनंतर नवाब मलिक यांनी एसीबी आणि एनसीबीचे विभागीय संचालक समीर वानखेडे यांच्याविरोधात मोर्चा उघडला होता. तेव्हापासून मलिक यांनी एक एक करत देवेंद्र फडणवीसांपर्यंत भाजपाच्या नेत्यांवर आरोपांची राळ उडवली होती. त्यानंतर भाजपाकडूनही मलिक यांचे अंडरवर्ल्डशी संबंध असल्याचा आरोप केला होता.
दरम्यान, नवाब मलिक भाजपाविरोधात आक्रमक झाल्यानंतर संजय राऊत यांनी त्यांचे कौतुक केले होते. नवाब मलिक यांच्या पत्रकार परिषदांमुळे भाजपाला सॉलिड उत्तर मिळालंय, असे संजय राऊत यांनी म्हटले होते. त्यानंतर आता नवाब मलिक यांनी संजय राऊत यांच्याबाबत शोलेस्टाईल शुभेच्छा दिल्याने आता या दोघांची मैत्री कुठल्या वळणावर जाईल याबाबत राजकीय वर्तुळात कुतूहल आहे.