Maharashtra Election 2024: "तुमची हिंमत असेल, तर माझी जागा पाडून दाखवा"; नवाब मलिकांचं भाजपला चॅलेंज
By ऑनलाइन लोकमत | Published: November 16, 2024 01:49 PM2024-11-16T13:49:42+5:302024-11-16T13:52:29+5:30
Nawab Malik Devendra Fadnavis BJP: शिवाजीनगर मानखुर्द विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवत असलेल्या नवाब मलिक यांच्याविरोधात भाजप काम करत आहे.
Nawab Malik Devendra Fadnavis: अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडून निवडणूक लढत असलेल्या नवाब मलिक यांनी भाजपला थेट आव्हान दिले आहे. माझ्यावर दहशतवादी, देशद्रोही म्हणून टीका करताहेत. पण, मी सगळ्यांवर फौजदारी आणि बदनामीचा खटला दाखल करणार असा इशाराही मलिकांनी देवेद्र फडणवीसांसह भाजपच्या नेत्यांना दिला.
नवाब मलिक यांनी टीव्ही ९ मराठी या वृत्तवाहनीला मुलाखत दिली. या मुलाखतीत त्यांनी भाजपकडून होत असलेल्या विरोधाला उत्तर दिले. नवाब मलिक शिवाजीनगर मानखुर्द विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवत आहेत. या मतदारसंघात भाजप शिवसेनेचा वेगळा उमेदवार आहे. तर अजित पवारांनी भाजपचा विरोध झुगारून नवाब मलिकांना उमेदवारी दिली आहे.
फडणवीसांचा पाठिंबा मलिक मागतोय का?
भाजपच्या विरोधाबद्दल बोलताना नवाब मलिक म्हणाले, "भाजप विरोधात आहे, हे जगजाहीर आहे. त्याचा काय फरक पडतो. त्यांचा पाठिंबा कोण मागतंय? देवेंद्र फडणवीसांचा पाठिंबा नवाब मलिक मागतोय का? आम्ही मागत नाही, आम्ही देणार नाही. अरे नवाब मलिक मागणारा नाही. आणि देणार पण, नाही. माझ्याबाबतीत त्यांचं काही असेल, पण मी बोलत राहणार. मी कोणाला घाबरत नाही", असे मलिक म्हणाले.
"माफी मागितली नाही, तर बदनामी खटला दाखल करेन"
"मी बोलायला सुरूवात केली, तर कोर्टात जाता. याची जामीन रद्द करा. तुरुंगात टाका ना, बघा माझी १०-२० हजार मते वाढतील. माझ्या बाबतीत जे गैरसमज निर्माण करताहेत... दाऊदशी माझं नाव जोडताहेत. दहशतवादी, देशद्रोही बोलत आहेत. या सर्वांच्या विरोधात तपासून नोटीस पाठवणारच. माफी मागितली नाही, तर त्यांच्याविरोधात फौजदारी आणि बदनामीचा खटला दाखल करणार", असा इशारा नवाब मलिक यांनी दिला.
"भाजपवाल्यांची मला गरज नाही. माझे विचार भाजपवाल्याशी कधी जुळणार नाही. हे कटेंगे बटेंगे वाह्यात पणा करताहेत. लोकांमध्ये तेढ निर्माण करताहेत. महाराष्ट्रात हे राजकारण चालणार नाही", असे उत्तर मलिकांनी दिले.
देवेंद्र फडणवीस तुमच्याबद्दल टीका करताहेत, बोलताहेत; त्यांना नोटीस पाठवणार का? या प्रश्नावर मलिक म्हणाले, "कितीही मोठा असो. मी कोणाला घाबरत नाही. जे जे माझी बदनामी करताहेत, किती मोठा नेता असो, मी सोडणार नाही."
"नवाब मलिकला पाडून दाखवा"
"पंतप्रधानांच्या सभेला राष्ट्रवादीचे नेते गेले नाहीत. मोदीजी, भाजपचे प्रचारक म्हणून त्या सभेत जातात. भाजपचे प्रचारक म्हणून ते प्रचार करताहेत, पंतप्रधान म्हणून नाही. आम्ही कोणालाही पाठिंबा मागत नाही. ताकद लावून... मी आज भाजपला आव्हान देतो. तुमची हिंमत असेल, तर नवाब मलिकची जागा पाडून दाखवा", असे आव्हान नवाब मलिक यांनी भाजपला दिले.