नवाब मलिक यांच्या जावयाला पुरावे नसल्याने जामीन मंजूर, विशेष न्यायालयाच्या निर्णयाला एनसीबी उच्च न्यायालयात आव्हान देणार

By ऑनलाइन लोकमत | Published: October 15, 2021 08:24 AM2021-10-15T08:24:16+5:302021-10-15T08:24:38+5:30

Court News:

Nawab Malik's son-in-law granted bail due to lack of evidence, NCB to challenge special court's decision | नवाब मलिक यांच्या जावयाला पुरावे नसल्याने जामीन मंजूर, विशेष न्यायालयाच्या निर्णयाला एनसीबी उच्च न्यायालयात आव्हान देणार

नवाब मलिक यांच्या जावयाला पुरावे नसल्याने जामीन मंजूर, विशेष न्यायालयाच्या निर्णयाला एनसीबी उच्च न्यायालयात आव्हान देणार

googlenewsNext

मुंबई :  राज्याचे अल्पसंख्याक विकास मंत्री नवाब मलिक यांचे जावई समीर खान यांच्या विरोधात पुरावे नसल्याचे निरीक्षण नोंदवत विशेष एनडीपीएस न्यायालयाने समीर  खान व अन्य दोघांची गेल्याच महिन्यात जामिनावर सुटका केली. दरम्यान, विशेष न्यायालयाच्या या निर्णयाला एनसीबी उच्च न्यायालयात आव्हान देणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

गेल्या महिन्यात न्यायालयाने दिलेल्या आदेशाची प्रत बुधवारी उपलब्ध झाली. समीर खान यांना १३ जानेवारी रोजी ड्रग्ज बाळगल्याप्रकरणी केंद्रीय अमली पदार्थ नियंत्रण कक्षाने (एनसीबी) अटक केली. खान हे ड्रग्ज विक्रीत सहभागी आहेत व ते ड्रग्जचे सेवनही करत असल्याचा  आरोप एनसीबीने केला आहे. रासायनिक पृथक्करण अहवालानुसार, पोलिसांनी जप्त केलेल्या ११ नमुन्यांत गांजाचे प्रमाण आढळले नाही. तसेच खान हे कटात सहभागी असल्याचे सिद्ध करणार पुरावे सादर केले नाहीत, असे न्यायालयाने म्हटले आहे.

जावयाकडे गांजा नाही, हर्बल तंबाखू सापडला - मलिक
- ‘माझ्या जावयाकडे कोणत्याही प्रकारचा गांजा आढळून आला नाही. हर्बल तंबाखू सापडल्याचे न्यायालयाच्या आदेशात दिसतेय. एनसीबीला गांजा आणि हर्बल तंबाखूतील फरक कळत नाही का?’ असा सवाल राष्ट्रवादीचे प्रवक्ते आणि मंत्री नवाब मलिक यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत केला.
- मलिक म्हणाले की, या प्रकरणात माझे जावई समीर खान यांना गोवण्यात आले. त्याविरुद्ध ते उच्च न्यायालयात दाद मागणार आहेत. विशिष्ट बातम्या पसरवून काही लोकांना बदनाम करण्याचे काम सुरू आहे. पतीच्या अटकेचा माझ्या मुलीवर आणि नातवावर विपरित परिणाम झाला. 
- माझे जावई ड्रग डीलर असल्याचे आरोप भाजपवाले आजही करीत असल्याने मला आज बोलावे लागत आहे. माझा जावई आणि अन्य दोघांना एनडीपीएसच्या विशेष न्यायालयाने साडेआठ महिन्यांनंतर तुरुंगातून सोडले. न्यायाधीशांच्या आदेशात कुठेही समीर खानकडे गांजा सापडल्याचा उल्लेख नाही, असा दावाही मलिक यांनी केला.

भाष्य करणे चुकीचे
नवाब मलिक यांच्या जावयाला अटक झाल्यानंतर त्यांची बहुतेक जनमानसात बदनामी झाली असावी, त्याची त्यांना मळमळ असावी. त्यामुळेच ते दर दिवशी केवळ सूडभावनेने तपास यंत्रणाविरुद्ध वक्तव्ये करीत आहेत. जे प्रकरण न्यायप्रविष्ट आहे, त्यावर भाष्य करणे चुकीचे आहे.
- प्रवीण दरेकर, विरोधी पक्षनेते, विधान परिषद. 

मलिक यांना वाय दर्जाची सुरक्षा
गेल्या काही दिवसांपासून भाजप व एनसीबीवर कडाडून टीका करणारे मलिक यांच्या सुरक्षा व्यवस्थेत वाढ करण्यात आली असून, त्यांना वाय दर्जाची सुरक्षा देण्यात आली आहे. आपल्याला सातत्याने धमक्या येत असल्याने राज्य सरकारने सुरक्षा वाढविली असल्याचे मलिक यांनी सांगितले. मलिक यांच्या ताफ्यात आता पायलट कारसह चार रिव्हाॅल्व्हरधारी रक्षकांचा समावेश करण्यात आला आहे. यापूर्वी त्यांच्या सुरक्षेसाठी पिस्तूलसह एक पोलीस गार्ड सोबत होता. 

एनसीबीचा सावध पवित्रा
मलिक यांच्या आरोपांवर एनसीबीने मात्र सावध पवित्रा घेतला आहे. मलिक यांच्या आरोपानंतर त्याबाबत एनसीबीचे विभागीय संचालक समीर वानखेडे यांची प्रतिक्रिया जाणून घेण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी, या प्रकरणात आम्ही वरच्या न्यायालयात अपील केले आहे. न्यायप्रविष्ट बाब असल्याने त्याबाबत काहीही बोलू शकत नाही, इतके सांगून अधिक बोलण्यास नकार दिला.

Web Title: Nawab Malik's son-in-law granted bail due to lack of evidence, NCB to challenge special court's decision

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.