झाकीर नाईकविरुद्ध निर्वाणीचे समन्स
By Admin | Published: February 28, 2017 04:59 AM2017-02-28T04:59:21+5:302017-02-28T04:59:21+5:30
(ईडी) वादग्रस्त इस्लामी धर्मप्रचारक डॉ. झकिर नाईक याच्याविरुद्ध सलग चौथे आणि बहुधा अंतिम समन्स काढले
मुंबई : ‘मनी लाँड्रिंग’च्या एका गुन्ह्यात अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) वादग्रस्त इस्लामी धर्मप्रचारक डॉ. झाकीर नाईक याच्याविरुद्ध सलग चौथे आणि बहुधा अंतिम समन्स काढले असून, यानंतरही नाईक हजर झाला नाही, तर त्याच्याविरुद्ध अटक वॉरंट मिळविण्यासाठी न्यायालयाकडे अर्ज करण्याचे संकेत दिले आहेत.
याआधी ‘ईडी’ने नाईक यास ९ फेब्रुवारी रोजी जबानीसाठी बोलावले होते तरी तो आला नाही; त्यामुळे आता हे नवे समन्स त्याला ई-मेलवर तसेच त्याच्या वकिलामार्फत बजावण्यात आले आहे.
याआधीच्या समन्सना नाईक याने वकिलामार्फत उत्तर दिले होते. त्यात त्याने आपल्याला व्यक्तिश: समन्स मिळाले नसल्याचे म्हटले होते. तसेच जाबजबाब देण्यासाठी स्वत: आलो तर अटक होण्याची भीती असल्याने आपण स्कायपे किंवा अन्य इलेक्ट्रॉनिक माध्यमातून जबाब देऊ किंवा ‘ईडी’ने लेखी प्रश्नावली पाठविल्यास त्यास उत्तर देऊ, असे कळविले होते. अर्थात, संशयित आरोपीचा अशा प्रकारे जाबजबाव घेण्याची कायद्यात तरतूद नसल्याने व या गंभीर गुन्ह्यात नाईक यास समोर हजर करूनच जबाब घेणे गरजेचे असल्याने ‘ईडी’ने त्याच्या या दोन्ही मागण्या अमान्य केल्या होत्या. (विशेष प्रतिनिधी)