नवाजुद्दीनवर विनयभंगाचा गुन्हा
By admin | Published: January 18, 2016 03:12 AM2016-01-18T03:12:51+5:302016-01-18T03:12:51+5:30
अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकी याने पार्किंगच्या वादातून महिलेचा विनयभंग केल्याची तक्रार वर्सोवा पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे
मुंबई : अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकी याने पार्किंगच्या वादातून महिलेचा विनयभंग केल्याची तक्रार वर्सोवा पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. या प्रकरणी नवाजुद्दीनविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अंधेरीतील झोहरा आघाडीनगर जेएनके सोसायटीमध्ये रविवारी दुपारी ही घटना घडली. रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हिंदी चित्रपटसृष्टीत हरहुन्नरी अभिनेता म्हणून नावारूपास येत असलेल्या नवाजुद्दीनचा सोसायटीतील अन्य रहिवाश्यांशी गेल्या काही दिवसांपासून कार पार्किंगवरून वाद सुरू होता. तो त्याच्या पार्किंगशिवाय अन्य जागेतही आपली कार पार्क करत असल्याने, सोसायटीने त्याला यापूर्वी नोटीस दिली होती. मात्र, तो त्याकडे दुर्लक्ष करत होता. रविवारी दुपारी सोसायटीच्या पार्किंगमध्ये एक जण मोटारसायकल लावत असताना नवाजुद्दीनच्या बॉडीगार्डने त्याला अडवले. त्यावरून वाद झाल्यानंतर अन्य फ्लॅटधारकही तिथे जमले. हा प्रकार समजल्यानंतर नवाजुद्दीनही फ्लॅटमधून खाली आला. तिथे असलेल्या एका महिलेबरोबर त्याचा वाद झाला. नवाजुद्दीनने आपल्याला धक्काबुक्की केल्याचा आरोप करीत तिने नियंत्रण कक्षात फोन करून पोलिसांना बोलावून घेतले.
तिच्या तक्रारीनुसार नवाजुद्दीन सिद्धीकीवर विनयभंग केल्याप्रकरणी गुन्हा नोंदविण्यात आला आहे, या प्रकरणी त्याच्यासह साक्षीदारांचे जबाब नोंदविण्यात येणार असल्याचे वर्सोवा पोलिसांकडून सांगण्यात आले. (प्रतिनिधी)