मेपूर्वी नालेसफाई
By admin | Published: April 7, 2017 01:18 AM2017-04-07T01:18:05+5:302017-04-07T01:18:05+5:30
स्थायी समितीच्या अध्यक्षा सीमा सावळे यांच्यासह सदस्यांनी स्थापत्य, आरोग्य आणि जलनि:सारण विभागाच्या अधिकाऱ्यांशी संवाद साधला
पिंपरी : स्थायी समितीच्या अध्यक्षा सीमा सावळे यांच्यासह सदस्यांनी स्थापत्य, आरोग्य आणि जलनि:सारण विभागाच्या अधिकाऱ्यांशी संवाद साधला. प्रश्न जाणून घेतले. उपाययोजना करण्याच्या सूचना केल्या. आरोग्य विभागाचे सक्षमीकरण करण्यासाठी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांकडून सूचना मागविल्या आहेत. मे महिन्यात नालेसफाई सुरू करण्यात येणार असल्याचे, प्रशासनाने सांगितले.
महापालिकेच्या स्थायी समिती सभागृहात आरोग्य अधिकारी, पदाधिकारी यांच्यात बैठक झाली. या वेळी आयुक्त दिनेश वाघमारे, सहआयुक्त दिलीप गावडे, सहायक आयुक्त मिनीनाथ दंडवते यांच्यासह विविध विभागांतील आरोग्य अधिकारी उपस्थित होते. बैठकीविषयी माहिती देताना सावळे म्हणाल्या, ‘‘नागरिकांचे आरोग्य सुदृढ ठेवले पाहिजे. अर्थसंकल्पातील तरतुदीचा उपयोग करून चांगली कामे केली पाहिजे. विकासकामे करण्यासाठी तरतूद करण्यात येईल. यंत्रणा, साहित्य देऊ.’’ (प्रतिनिधी)
शंभर कोटींची बिले थकलेली
पिंपरी : महापालिका अधिकारी, प्रशासन, स्थायी समिती सदस्य, ठेकेदार यांची आज बैठक झाली. त्या वेळी गेल्यावर्षातील शंभर कोटींची बिले थकीत आहेत, असे निदर्शनात आणून दिले. त्यावर चर्चा होऊन, आर्थिक वर्षातील बिले त्याच कालखंडात देण्यात यावीत, अशी सूचना समितीने केली. महापालिकेच्या स्थायी समिती सभागृहात स्थायी समिती अध्यक्षा सीमा सावळे, आयुक्त दिनेश वाघमारे, मुख्यलेखा परीक्षक राजेश लांडे, ठेकेदार, विविध विभागांचे प्रमुख उपस्थित होते.
चालू अंदाजपत्रकावर थकबाकीचा बोजा
ठेकेदारांनी आपल्या कामांची बिले ३१ मार्चपूर्वीच द्यावीत, असे लेखा विभागाने सूचित केले होते. यासंदर्भात बैठक झाली. याविषयी सावळे म्हणाल्या, ‘‘गेल्या वर्षाच्या कालखंडातील ठेकेदारांची शंभर कोटींची बिले थकली आहेत. ठेकेदारांची बिले देण्याबातही बैठक झाली. मात्र, त्यामध्ये तोडगा निघाला नाही. गतवर्षीच्या बजेटमधून बिले द्यायची की चालू अंदाजपत्रकातून याची चर्चा सुरू आहे. थकलेल्या बिलांचा या अंदाजपत्रकावर बोजा पडणार असून विकासकामांना निधी अपुरा पडू शकतो.’’
आरोग्य विभागातील कर्मचाऱ्यांना सर्व सुविधा पुरविण्यात येतील. त्यांच्या समस्या सोडविल्या जातील. मात्र, कर्मचाऱ्यांनी कामाच्या बाबतीत कामचुकारपणा करू नये, कामाच्या वेळेत कामच करावे, थम्ब इंम्प्रेशनऐवजी कर्मचाऱ्यांना स्फेस रिडर कंपलसरी केले आहे. मुजोर कामगारांचे यापुढे लाड खपवून घेतले जाणार नाही. जे काम आहे, ते कर्मचाऱ्यांनी केलेच पाहिजे. गणवेशापासून ते मास्कपर्यंतची सर्व सेवासाधने पुरविणे महापालिकेसह कंत्राटदारांना बंधनकारक आहे.
- सीमा सावळे, अध्यक्षा, स्थायी समिती
निविदा काढण्यात दिरंगाई
बैठकीत नालेसफाई, नदीपात्रातील जलपर्णी काढणे, धूर फवारणीचाही आढावा घेतला. जलपर्णी बेसुमार वाढली असून, डासांमुळे रहिवाशांचे जगणे मुश्किल झाल्याचा आरोप नगरसेविका आशा शेंडगे यांनी केला. त्या वेळी जलपर्णी काढण्यासाठी निविदाच काढली नसल्याचे उघड झाले. त्यावर जलपर्णी काढण्याची निविदा प्रक्रिया नुकतीच पूर्ण झाल्याची माहिती दंडवते यांनी दिली. अखेरीस, तातडीने जलपर्णी काढण्याचे आदेश सावळे यांनी दिले. त्यावर १ मेपासूनच नालेसफाई कामे सुरू करणार असल्याचे दंडवते यांनी स्पष्ट केले.