गोंदियात नक्षली हल्ल्याचा कट उधळला; पोलिसांना उडविण्यासाठी पेरले होते सुरुंग

By admin | Published: April 26, 2017 02:24 AM2017-04-26T02:24:34+5:302017-04-26T02:24:34+5:30

छत्तीसगडमध्ये नक्षलवाद्यांनी केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या बटालियनवर केलेल्या हल्ल्यात २५ जवान शहीद झाले असतानाच

Naxal attacks on Gondiya The police were sown to blow up the crew | गोंदियात नक्षली हल्ल्याचा कट उधळला; पोलिसांना उडविण्यासाठी पेरले होते सुरुंग

गोंदियात नक्षली हल्ल्याचा कट उधळला; पोलिसांना उडविण्यासाठी पेरले होते सुरुंग

Next

केशोरी (गोंदिया) : छत्तीसगडमध्ये नक्षलवाद्यांनी केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या बटालियनवर केलेल्या हल्ल्यात २५ जवान शहीद झाले असतानाच, गोंदियात भूसुरुंगाद्वारे पोलिसांना उडवण्याचा नक्षलींचा कट मंगळवारी उधळून लावला.
अर्जुनी मोरगाव तालुक्यातील भरनोली ते बोरटोल या गावांदरम्यान जंगलातील डांबरी रस्त्यालगत नक्षलवाद्यांनी आपले बॅनर लावल्याचे सोमवारी उघडकीस आले होते. तेंदू कंत्राटदारांना इशारा देणारे हे बॅनर काढण्यासाठी गेलेल्या पोलिसांना त्या ठिकाणी भूसुरुंग पेरून ठेवल्याचे वेळीच लक्षात आले. बॉम्बशोधक व नाशक पथकाने सायंकाळी ते निकामी केले. बॅनरच्या निमित्ताने पोलिसांना त्या ठिकाणी येण्यास प्रवृत्त करायचे आणि भूसुरुंग उडवून घातपात घडवायचा, असा नक्षलवाद्यांचा डाव होता. मात्र, पोलिसांच्या सतर्कतेमुळे हा घातपात टळला.
बॅनरच्या जवळच तीन भूसुरुंग पेरलेले होते. जमिनीत स्टीलच्या डब्यात दारूगोळा भरून त्याला प्रेशर बॉम्ब बनविले होते. याशिवाय डिटोनेटर्सचा वापर करून टायमरसुद्धा लावलेले होते. प्रेशर बॉम्ब म्हणून त्या भूसुरुंगाने काम न केल्यास, पोलीस तो डबा उघडण्यासाठी जातील आणि झाकण उघडताच टायमर सुरू होऊन काही क्षणात बॉम्ब फुटेल, अशी व्यवस्था केली होती. मात्र, भूसुरुंगाची एक वायर पोलिसांना दिसल्यानंतर, काहीतरी गडबड असल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यानंतर, त्यांनी सावधपणे परिसरात तपासणी केली.
गोंदियावरून बॉम्ब शोधक व नाशक पथकाला पाचारण केले. त्यांनी ते भूसुरुंग निकामी केले. विशेष म्हणजे, भरनोली येथे पोलिसांचे सशस्त्र दूरक्षेत्र केंद्र (एओपी) आहे. तिथे २४ तास सशस्त्र पोलिसांचा ताफा असतो. तेथून अवघ्या दीड किलोमीटर अंतरावर नक्षल्यांनी भुसुरूंग पेरून बॅनर लावण्याची हिंमत केल्यामुळे आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
पोलीस सतर्क 
बॅकफूटवर गेल्याचा बनाव निर्माण करणाऱ्या माओवाद्यांनी छत्तीसगडमध्ये अचानक आक्रमक होत क्रौर्याची परिसीमा गाठली आहे. अवघ्या ४३ दिवसात तीन मोठ्या घातपाती घटना घडवत ३९ जवानांचे बळी घेतले. माओवादी गडचिरोली-गोंदियातही घातपात घडवण्याच्या प्रयत्नात आहेत. नक्षल्यांनी दीड महिन्यात जाळपोळ, हल्ले आणि चकमकीच्या ११ घटना घडवल्या. 
४ महिन्यात ५ निरपराध नागरिकांची हत्या केली असून कोणत्याहीक्षणी नक्षल्यांकडून गडचिरोली-गोंदियात ‘सुकमा’ची पुनरावृत्ती घडवून आणण्याचे संकेत असून पोलीस सतर्क झाले आहेत. (वार्ताहर)
सुकमा हल्ला; नक्षलवाद्यांकडे होते रॉकेट लाँचर, एके-४७ रायफल
सीआरपीएफच्या बटालियनवर हल्ला करण्यासाठी नक्षलींनी एके-४७ सारख्या शस्त्राचा वार केला. एवढेच नाही, तर त्यांच्याकडे रॉकेट लाँचर होते, अशी माहिती या हल्ल्यात जखमी झालेल्या जवानने दिली आहे.
सकाळी ८.३० वाजता ७४ व्या बटालियनचे सुमारे ९९ जवान दुर्गपाल छावणी सोडून चिंतागुफात पोहोचले. तेथे ते दोन गटांत रस्त्याच्या दोन बाजूंनी विभागले. त्या भागात ३००-४०० नक्षलवादी लपून बसले होते. नक्षलवाद्यांनी अचानक त्यांना घेरले.
हल्लेखोरांनी आयईडी स्फोटकांनी हल्ला केला व नंतर दुपारी १२.२५ वाजता त्यांच्यावर बेछूट गोळीबार केला. नक्षलवाद्यांनी या वेळी एके-४७ सारख्या शस्त्रांचाही वापर केला. या हल्ल्यामागे हिदिमा हा त्यांचा नेता होता.
२२ शस्त्रे गायब : या हल्ल्यानंतर सीआरपीएफच्या या तुकडीचे २२ शस्त्रे गायब झाल्याचे आढळून आल्याचे सूत्रांनी सांगितले. त्यात १२ एके-४७ रायफल, चार एकेएम रायफल, दोन इंसास लाइट मशिन गन, तीन इंसास रायफल यांचा समावेश आहे. शिवाय जवानांकडील अन्य साहित्यही नक्षलींनी पळवले आहे.

नक्षलवाद्यांशी लढण्याच्या धोरणाचा सरकार फेरआढावा घेईल. नक्षलवाद्यांचा हिंसाचार समूळ नष्ट करण्याचे मार्ग शोधण्यासाठी नक्षलग्रस्त राज्यांची बैठक ८ मे रोजी घेतली जाईल.- राजनाथसिंह, केंद्रीय गृहमंत्री 

Web Title: Naxal attacks on Gondiya The police were sown to blow up the crew

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.