नक्षलींची भीती झुगारून ते आले सैन्यभरतीला..!

By Admin | Published: January 10, 2017 07:55 PM2017-01-10T19:55:53+5:302017-01-10T20:00:12+5:30

‘‘आम्ही सैन्यभरतीसाठी आलो, आता इकडेच सेटल झालो तर ठिक होईल. गावाकडे गेलो तर जगू-वाचू गॅरंटी नाही...’’ सैन्यभरतीकरिता गडचिरोलीतून आलेल्या तरुणांचा

Naxalism was defeated by the army! | नक्षलींची भीती झुगारून ते आले सैन्यभरतीला..!

नक्षलींची भीती झुगारून ते आले सैन्यभरतीला..!

googlenewsNext
>- अविनाश साबापुरे/ ऑनलाइन लोकमत
 
यवतमाळ, दि. 10 - ‘‘आम्ही सैन्यभरतीसाठी आलो, आता इकडेच सेटल झालो तर ठिक होईल. गावाकडे गेलो तर जगू-वाचू गॅरंटी नाही...’’ सैन्यभरतीकरिता गडचिरोलीतून आलेल्या तरुणांचा हा स्वर आहे. भारत सरकारचा कायम विरोध करीत जेथे नक्षल्यांचे समांतर सरकार प्रबळ आहे, त्याच गडचिरोली जिल्ह्यातील तरुणांनी भारताच्या रक्षणासाठी सैनिक होण्याचा निर्धार केला आहे. नक्षल्यांची जरब झुगारून आलेल्या या तरुणांनी मंगळवारी ‘लोकमत’शी बोलताना देश आणि समाजाबद्दल उत्कट प्रेम व्यक्त केले. 
यवतमाळात सुरू असलेल्या विदर्भस्तरीय सैन्यभरतीत वैभव वासेकर, आकाश वासेकर, गणेश कुनघाडकर हे तरुण शारीरिक चाचण्यांमध्ये उत्तीर्ण झाले. आता त्यांना लेखी परीक्षेसाठी पुण्याला जावे लागणार आहे. तत्पूर्वी गावाकडे (कुनघाडा, ता. चामोर्शी, जि. गडचिरोली) जायचे आहे. पण यापूर्वीचे काही अनुभव पाहता ते क्षणभर विचारात पडले... ते म्हणाले, गेलो तर काय होईल सांगता येत नाही. आमचे गाव सध्या तरी धोक्यापासून दूर आहे. पण कमळापूर, भामरागड असे घनदाट जंगलांचे परिसर नक्षल्यांनी पूर्णपणे व्यापलेले आहे. तेथील तरुणांना तर सैन्यभरतीची माहितीही नसावी, इतके ते दुर्लक्षित आहे. त्यामुळेच सैन्यभरतीत गडचिरोलीतून सर्वात कमी मुलं येतात. आमच्या जिल्ह्यातले जे लोक अशा भरतीसाठी येतात, ते परत गावाकडे येत नाही. आले तर वाचत नाही. एकदा इन्टीमेशन दिली जाते. ऐकले नाही तर सरळ शूट केले जाते...! 
सर्वसामान्यांसारखेच दिसणारे नक्षली कधी घात करतील, याचा नेम नसल्याने गडचिरोलीतील तरुण ‘नॉर्मल’ जगणे जाणीवपूर्वक टाळतात. एखादी व्यक्ती चारचौघांपेक्षा वेगळी दिसली रे दिसली, की लगेच नक्षल्यांच्या निशाण्यावर येते. त्यामुळेच कारवाफा (ता. धानोरा) येथून आलेला हर्षद बावणे हा तरुण ‘नाव छापू नका’ अशी अट घालूनच बोलायला तयार झाला. अवघ्या दीड एकर शेतीत आईवडील, दोन बेरोजगार भाऊ राबतात. हर्षदही बारावी शिकून शेतीतच राबतो. त्यामुळे जिवाची भीती असली तरी तो सैन्यभरतीकरिता जिल्ह्याच्या बाहेर पडला. 
गडचिरोलीसह भंडारा-गोंदियाच्या ब-याचशा भागात नक्षली कारवायांचे गडद सावट आहे. मात्र, या भीतीसोबतच गरिबी आणि बेरोजगारी हे दोन मोठे शत्रू ठरत आहे. अभावग्रस्त जगण्यातूनच देशासाठी जगण्या-मरण्याची आण घेण्यापर्यंत येथील तरुणांची मजल गेली आहे. पवनीचा (जि. भंडारा) सोनू कोरे शेतमजुरी करत बी.कॉम. फायनलपर्यंत शिकत आला. ‘इतरत्र नोकरी शोधायची तर डोनेशन देऊन गुलामी करावीच लागणार आहे. मग देशाच्या सीमेवर नोकरी करीत मेलो तर काय हरकत आहे?’ हा प्रश्न स्वत:ला विचारत तो सैन्यभरतीत सामील झाला. महिनाभर धान मळणीयंत्रावर मजुरी करून त्याने ५ हजार कमावले अन् तेच घेऊन तो भरतीसाठी यवतमाळात आला. आईवडील वृद्ध असूनही मजुरी करतात ही सल त्याच्या मनात असली तरी समाजासाठी आपले कर्तव्य ओळखून त्याने दोनवेळा रक्तदानही केले. गोंदियाच्या एमआयटी कॉलेजमध्ये बीई करीत असलेला पियूष बनसोडही सैनिक होण्यासाठी आलाय. येथे ‘डोनेशन’ द्यावे लागत नाही, हेच त्याच्या येण्याचे एकमेव कारण. त्याचेच मित्र विवेक सडमथे, साजीद पठाण, सतीश मस्के, अक्षय चौधरी, महेंद्र कारेमोरे, क्षितीज तागडे हे तरुणही याच कारणाने आले आहेत. 
 
पहले देश, बाद मे पेट : शादाब पठाण 
‘आजकल कुछ लोग मुसलमान बोले तो पाकिस्तान का आदमी मानते हैं. लेकीन मेरे को पाकिस्तान से कोई लेना देना नही. जो हम को पाल रहा हैं वो भारतही मेरा सबकुछ हैं.’ हे वाक्य आहे सैन्यभरतीसाठी आलेल्या गोंदियाच्या शादाब पठाणचे. बीए करता-करता तू सैन्यभरतीसाठी का आला, या प्रश्नावर शादाब म्हणाला, ‘देश को अपुन सबकुछ मानता हूं. पिताजीका चिकन सेंटर हैं. वो धंदे मे भी पेट भर सकता हैं. लेकीन मेरलिए पहले देश हैं, उसके बाद मे पेट.’ काटोलच्या ‘टँगो चार्ली करिअर अकॅडमी’च्या ग्रूपने यवतमाळातील सैन्यभरतीत मोफत जेवणाची सोय केली आहे. त्यांच्याच सोबत राहून शादाबही इतर तरुणांना जेवण वाढून देत आहे.

Web Title: Naxalism was defeated by the army!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.