नक्षलींचा महिलेवर अत्याचार, १० वर्षांचा कारावास कायम
By admin | Published: June 16, 2014 01:01 AM2014-06-16T01:01:53+5:302014-06-16T01:01:53+5:30
गडचिरोली जिल्ह्यातील धानोरा तालुक्यात एका आश्रम शाळेमध्ये कार्यरत महिलेवर तीन नक्षलींनी सामूहिक अत्याचार केला. याप्रकरणातील एका आरोपीची १० वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा मुंबई उच्च न्यायालयाच्या
हायकोर्ट : गडचिरोली जिल्ह्यातील घटना
नागपूर : गडचिरोली जिल्ह्यातील धानोरा तालुक्यात एका आश्रम शाळेमध्ये कार्यरत महिलेवर तीन नक्षलींनी सामूहिक अत्याचार केला. याप्रकरणातील एका आरोपीची १० वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने कायम ठेवली आहे.
सुनील दशरथ गावडे (२६) असे शिक्षेस पात्र ठरलेल्या आरोपीचे नाव असून तो गोदलवाही, ता. धानोरा (गडचिरोली) येथील रहिवासी आहे. दुसऱ्या आरोपीचे नाव आनंदराव लख्खू उसेंडी आहे. तिसरा आरोपी घटनेनंतर फरार झाला होता.
धानोरा पोलिसांनी घटनेच्या तपासानंतर गावडे व उसेंडीविरुद्ध न्यायालयात आरोपपत्र दाखल केले होते. गडचिरोली सत्र न्यायालयाने दोन्ही आरोपींना भादंविच्या कलम ३७६(२)(जी) अंतर्गत १० वर्षे सश्रम कारावास व १००० रुपये दंड, कलम ३५४ अंतर्गत १ वर्ष, कलम ३२३ अंतर्गत ३ महिने, तर कलम ५०६ अंतर्गत २ वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा ठोठावली होती. याविरुद्ध गावडेने उच्च न्यायालयात अपील केले होते. न्यायमूर्ती एम. एल. तहलियानी यांनी प्रकरणातील विविध बाबी लक्षात घेता गावडेचे अपील फेटाळून सत्र न्यायालयाचा निर्णय कायम ठेवला आहे.
ही घटना २९ जुलै २००९ रोजी मध्यरात्रीनंतर घडली होती. धानोरा तालुका नक्षलग्रस्त भाग आहे. २८ जुलै २००९ रोजी नक्षलींनी बंद पुकारला होता. आश्रम शाळेने बंद पाळला नव्हता. यामुळे नक्षली चिडले होते. बंदचे आवाहन झुगारण्याचे कारण विचारण्यासाठी आरोपी व त्यांच्या सहकाऱ्यांनी जंगलात आश्रम शाळा कर्मचाऱ्यांची बैठक बोलावली. दरम्यान, गावडेने एका महिलेचा विनयभंग केला. यानंतर तिन्ही आरोपींनी आश्रम शाळेच्याच एका महिलेवर जंगलात नेऊन आळीपाळीने अत्याचार केला.
पीडित महिला विवाहित असून तिला दोन मुले आहेत. त्यावेळी मुले बाहेरगावी शिकत होती. सोबत कोणीच नसल्याने पीडित महिला शेजारी कर्मचाऱ्याच्या निवासस्थानी झोपायला गेली होती. आरोपी तिला धाक दाखवून जंगलात घेऊन गेले होते. सत्र न्यायालयात सरकारी पक्षातर्फे १८ साक्षीदार तपासण्यात आले होते. (प्रतिनिधी)