नक्षलवाद्यांनी तेलंगणामधील पूल कामावरचे वाहने जाळले
By admin | Published: April 27, 2016 06:51 PM2016-04-27T18:51:30+5:302016-04-27T18:51:30+5:30
अहेरी तालुका मुख्यालयापासून तीन किमी अंतरावर तेलंगणा राज्याच्या सीमेत बुधवारी मध्यरात्री २.१५ ते ३.१५ वाजताच्या सुमारास चार नक्षलवाद्यांनी पूल कामाजवळ येऊन येथील अत्याधुनिक
Next
>- विवेक बेझलवार, अहेरी (गडचिरोली)
अहेरी तालुका मुख्यालयापासून तीन किमी अंतरावर तेलंगणा राज्याच्या सीमेत बुधवारी मध्यरात्री २.१५ ते ३.१५ वाजताच्या सुमारास चार नक्षलवाद्यांनी पूल कामाजवळ येऊन येथील अत्याधुनिक वाहनांची जाळपोळ केली. तसेच कामाच्या ठिकाणी असलेल्या मजुरांचे २९ भ्रमणध्वनी संच घेऊन नक्षलवादी पसार झालेत.
तेलंगणा-महाराष्ट्र राज्याला जोडणा-या प्राणहिता नदीवर अहेरीपासून तीन किमी अंतरावर वांगेपल्ली ते गुडम गावादरम्यान पुलाचे बांधकाम युद्धपातळीवर सुरू आहे. या पुलामुळे दोन राज्यांचा संपर्क जुळणार होता. या कामावर बुधवारच्या पहाटे २.१५ ते ३.१५ वाजताच्या सुमारास चार नक्षलवादी आलेत. त्यांनी मजुराच्या टिनशेडमध्ये घुसून ३० मजुरांना एकत्र जमा केले. त्यांच्याजवळचे ३० भ्रमणध्वनी हिसकावून घेतले. कुणालाही मारहाण केली नाही. याच ठिकाणी असलेले एक ट्रॅक्टर, एक टिप्पर, एक पोकलॅन्ड मशीन व एक जेसीबी यंत्र याची जाळपोळ केली. तेलगू भाषेत लिहिलेले एक पत्रक येथे उपस्थित असलेल्या मजुराच्या हाती दिले. या पत्रकात मे महिन्यात ४ व ५ तारखेला आमचे मोठे संमेलन असून तोपर्यंत सदर काम बंद ठेवावे, अशी धमकी नक्षलवाद्यांनी दिली. त्यानंतर केवळ एकाच मजुराचा भ्रमणध्वनी सीम काढून वापस केला. बाकी सर्व भ्रमणध्वनी घेऊन माओवादी घटनास्थळावरून पसार झाले. या चार नक्षलवाद्यांकडे चार बंदुका, दोन रिव्हाल्वर, एक कु-हाड व केरोसीन तसेच स्प्रेपंप होता, अशी माहिती प्रत्यक्षदर्शी यांनी दिली.
घटनास्थळावर जवळजवळ ५० लाख रूपयांच्या मालमत्तेची जाळपोळ करण्यात आली आहे. ३० लाख रूपयांचे नुकसान झाल्याचे घटनास्थळी उपस्थितीत एका वरिष्ठ मजुराने ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. नक्षलवाद्यांच्या जाळपोळीमुळे पूल बांधकामावर परिणाम होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. यासंदर्भात तेलंगणा राज्याच्या आदिलाबाद जिल्ह्यातील बेज्जूर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे.