नक्षलवाद्यांकडून तरुणाची हत्या
By admin | Published: July 25, 2014 12:44 AM2014-07-25T00:44:06+5:302014-07-25T00:44:06+5:30
तालुक्यातील आसरअल्ली पोलीस ठाण्याच्या हद्दीत आसरअल्लीपासून ६ किमी अंतरावर गुमलकोंडा गावात नक्षलवाद्यांनी बुधवारी रात्री ११ वाजता २८ वर्षीय तरूणाची गोळी झाडून हत्या केली.
गुमलकोंडा येथील घटना : १२ ते १५ नक्षलवाद्यांचा सहभाग
सिरोंचा : तालुक्यातील आसरअल्ली पोलीस ठाण्याच्या हद्दीत आसरअल्लीपासून ६ किमी अंतरावर गुमलकोंडा गावात नक्षलवाद्यांनी बुधवारी रात्री ११ वाजता २८ वर्षीय तरूणाची गोळी झाडून हत्या केली.
२८ जुलैपासून नक्षलवाद्यांकडून शहीद सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. गेल्या काही दिवसांपासून सिरोंचा तालुक्याच्या अनेक गावांमध्ये नक्षलवादी पत्रके टाकत आहेत. या पत्रकातून पोलिसांच्या जनजागरण मेळाव्याचा विरोध करण्याचे आवाहन नक्षलवाद्यांनी नागरिकांना केले होते. या पार्श्वभूमीवर बुधवारी रात्री ११ वाजता १२ ते १५ च्या संख्येत नक्षलवादी गुमलकोंडा गावात आले. त्यांनी गावातील २८ वर्षीय युवक समय्या पोचम लाटकरी याचे घर गाठले. त्याला घरातून उचलून गावाबाहेर प्रवेशद्वाराजवळील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेजवळ आणून त्याची हत्या केली.
समय्या हा पोलिसांना नक्षलवाद्यांविषयी माहिती देण्याचे काम करीत होता. तो पोलिसांचा खबऱ्या होता. म्हणून त्याची हत्या केली, असे नक्षलवाद्यांनी म्हटले आहे. घटनास्थळावर पत्रके सोडण्यात आलेली नाही. या घटनेमुळे परिसरात नागरिकांमध्ये दहशत आहे. शहीद सप्ताहाच्या तोंडावर ही घटना घडली आहे. (तालुका प्रतिनिधी)