"तेव्हा नक्षलवाद्यांनी शिंदेंना हत्येची धमकी दिली, पण उद्धव ठाकरेंनी त्यांना झेड प्लस सुरक्षा नाकारली", सुहास कांदेंचा गंभीर आरोप
By ऑनलाइन लोकमत | Published: July 22, 2022 12:16 PM2022-07-22T12:16:02+5:302022-07-22T12:21:12+5:30
Suhas Kande Serious Allegations on Uddhav Thackeray: एकनाथ शिंदे हे गडचिरोलीचे पालकमंत्री असताना त्यांना नक्षलवाद्यांनी जीवे मारण्याची धमकी दिली होती. मात्र त्यावेळी तत्कालिन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांना झेड प्लस सुरक्षा देऊ नका, अशी सूचना दिली होती, असा गंभीर आरोप सुहास कांदे यांनी केला आहे.
नाशिक - युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे हे आज नाशिक दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यात ते शिवसेनेतील बंडखोर आमदार सुहास कांदे यांच्या मतदारसंघालाही भेट देणार आहेत. दरम्यान, आदित्य ठाकरेंच्या या दौऱ्यापूर्वी सुहास कांदे यांनी आदित्य ठाकरे आणि उद्धव ठाकरेंवर गंभीर आरोप केले आहेत. एकनाथ शिंदे हे गडचिरोलीचे पालकमंत्री असताना त्यांना नक्षलवाद्यांनी जीवे मारण्याची धमकी दिली होती. मात्र त्यावेळी तत्कालिन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांना झेड प्लस सुरक्षा देऊ नका, अशी सूचना दिली होती, असा गंभीर आरोप सुहास कांदे यांनी केला आहे.
सुहास कांदे म्हणाले की, महाविकास आघाडी सरकारच्या काळात एकनाथ शिंदे यांच्याकडे गडचिरोलीच्या पालकमंत्रिपदाची जबाबदारी होती. तेव्हा नक्षलवाद्यांनी मारण्याची धमकी दिली. त्यांना मारण्यासाठी ते ठाण्यात आणि मुंबईत आले होते. नक्षलवाद्यांकडून एकनाथ शिंदे यांच्या जीवितास धोका असल्याचा अहवाल गुप्तचर यंत्रणांनी दिला होता. मात्र त्यावेळी एकनाथ शिंदे यांना झेड प्लस सुरक्षा व्यवस्था नाकारण्यात आली. हिंदुत्वविरोधकांना सुरक्षा दिली. मात्र हिंदुत्ववाद्यांना का सुरक्षा देण्यात आली नाही. एकनाथ शिंदे यांना सुरक्षा देऊ नका, असा फोन वर्षा बंगल्यावरून शंभूराजे देसाई यांना फोन करण्यात आला होता. एकनाथ शिंदेंना सुरक्षा का देण्यात आली नाही, असा प्रश्न मला पडला आहे.
दरम्यान, एकनाथ शिंदे यांना सुरक्षा देण्याची गरज नाही, असा फोन वर्षावरून शंभूराज देसाई यांना आला होता, या सुहास कांदे यांनी केलेल्या दाव्याला शंभुराज देसाई यांनी दुजोरा दिला आहे. एकनाथ शिंदेंच्या जीविताला आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या जीविताला धमदी देणारं पत्र आलं होतं, त्यांना सुरक्षा देण्याचं मी सभागृहात जाहीर केलं होतं. त्यानंतर मी पोलीस अधिकाऱ्यांची बैठकही घेतली होती. त्यानंतर मला वर्षावरून त्यांची सुरक्षा वाढवण्याची गरज नाही, असा फोन आला होता, असे देसाई म्हणाले.
मात्र काँग्रेसचे नेते सतेज पाटील यांनी सुहास कांदे यांचे आरोप फेटाळले आहेत. याबाबतचे निर्णय हे गृहराज्यमंत्री घेत नाहीत, तर ते मुख्य सचिव घेतात. ते सर्व प्रकारची पडताळणी करून कुणाला संरक्षण द्यायचं, कुणाला नाही हे ठरवतात. त्यामुळे मला या गोष्टीमध्ये काही तथ्य वाटत नाही, असं सांगत माजी गृहराज्यमंत्री आणि काँग्रेसचे नेते सतेज पाटील यांनी सुहास कांदे यांचे आरोप फेटाळून लावले आहेत.