नक्षलवाद्यांनी केली अपहृत पोलिसाची हत्या
By admin | Published: May 17, 2016 03:13 AM2016-05-17T03:13:54+5:302016-05-17T03:13:54+5:30
नक्षलवाद्यांनी अपहृत पोलिसाची हत्या करून त्याचा मृतदेह सोमवारी सकाळी भामरागडपासून सात किमी अंतरावरील आरेवाडा गावाजवळ टाकून दिला.
गडचिरोली : नक्षलवाद्यांनी अपहृत पोलिसाची हत्या करून त्याचा मृतदेह सोमवारी सकाळी भामरागडपासून सात किमी अंतरावरील आरेवाडा गावाजवळ टाकून दिला. या घटनेने परिसरात प्रचंड दहशत पसरली आहे. भामरागड एलओएस नक्षली दलमचा हात असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. या पोलिसाची सहा दिवसांपूर्वी अपहरण झाले होते.
भामरागड तालुक्याच्या कोठी पोलीस मदत केंद्रांतर्गत कार्यरत बंडू गिसू वाचामी (२८) हे १० मे रोजी दुचाकीने गडचिरोलीकडे जात असताना माओवाद्यांनी त्यांचे अपहरण केल्याचे सांगण्यात येत होते. पोलीस दलाने याबाबत दुजोरा दिलेला नव्हता. त्यांचा शोध घेण्यासाठी उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप गावित यांच्या मार्गदर्शनात मोहीम राबविण्यात आली. परंतु रविवारपर्यंत वाचामी यांचा कुठेही ठावठिकाणा लागला नाही.
त्यानंतर रविवारी सायंकाळी पोलिसांनी वाचामी यांच्या अपहरणाचा अज्ञात व्यक्तीविरूध्द गुन्हा दाखल केला. त्यानंतर सोमवारी पहाटेच वाचामी यांचा मृतदेह आरेवाडा गावाजवळील बांबू डेपोजवळ पडून असल्याचे दिसून आले. कानाच्या खालच्या भागाला गोळी मारून त्यांची हत्या करण्यात आली. त्यांच्या पश्चात पत्नी व एक वर्षाचा मुलगा, भाऊ, बहिण, आई असा आप्तपरिवार आहे. (प्रतिनिधी)
नक्षलवाद्याला अटक
धानोरा तालुक्याच्या जारावंडी परिसरात गडचिरोली पोलीस दल व केंद्रीय राखीव पोलीस दल १९२ डी व एफ बटालियनने मोहीम राबवून जहाल नक्षलवादी रमेश कोको कोरामी (३५) याला रविवारी अटक केली.
कोरामी हा नक्षल प्लाटून दलम क्रमांक ३ चा सदस्य व अॅक्शन टीम सदस्य म्हणून कार्यरत होता. त्याच्यावर चार लाखांचे बक्षिसही असून छत्तीसगड व गडचिरोली जिल्ह्यात आठ गुन्ह्यांमध्ये त्याचा सहभाग होता, अशी माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक संदीप पाटील यांनी दिली आहे.