नयना पुजारी खूनप्रकरणी तिघे दोषी
By admin | Published: May 9, 2017 02:47 AM2017-05-09T02:47:18+5:302017-05-09T02:47:18+5:30
पुण्याला हादरवणाऱ्या संगणक अभियंता नयना अभिजीत पुजारी (वय २६) हिच्या खून प्रकरणातील तीन आरोपींना विशेष सत्र न्यायाधीश एल. एल. येनकर यांच्या न्यायालयाने दोषी ठरविले.
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : पुण्याला हादरवणाऱ्या संगणक अभियंता नयना अभिजीत पुजारी (वय २६) हिच्या खून प्रकरणातील तीन आरोपींना विशेष सत्र न्यायाधीश एल. एल. येनकर यांच्या न्यायालयाने दोषी ठरविले. खून, सामूहिक बलात्कार, जबरी चोरी, मृताच्या शरीरावरील ऐवज चोरणे, कट रचणे अशा सहा कलमांखाली आरोपींना दोषी ठरवले आहे. आरोपींना फाशीची शिक्षा द्यावी अशी मागणी सरकारपक्षाकडून केली जाणार असून, आज (मंगळवारी) युक्तिवाद केला जाणार आहे.
योगेश अशोक राऊत (वय २९ गोळेगाव, आळंदी, ता.खेड), महेश बाळासाहेब ठाकूर (२६, सोळू,खेड ), विश्वास हिंदूराव कदम (२७, दिघी आळंदी रस्ता, ता. खेड, मूळगाव भुरकवाडी, खटाव, सातारा) अशी दोषी ठरवलेल्यांची नावे आहेत. राजेश पांडुरंग चौधरी (वय २६, राहणार गोळेगाव, आळंदी, ता.खेड) या माफीच्या साक्षीदाराला दोषी ठरवलेले नाही. आॅक्टोबर २००९ रोजी घडलेल्या या घटनेचा निकाल लागण्यास सात वर्षांचा कालावधी लागला. सरकारपक्षाकडून ३७ साक्षीदार तपासण्यात आले. विशेष सरकारी वकील हर्षद निंबाळकर यांनी सरकार पक्षाकडून बाजू मांडली. त्यांना सत्यम निंबाळकर, ॠषीकेश कांबळे यांनी सहकार्य केले. बचाव पक्षातर्फे बी. ए. अलुर, रणजीत ढोमसे पाटील, अंकुशराजे जाधव यांनी १३ साक्षीदारांच्या साक्षी नोंदवल्या.
युक्तिवाद पूर्ण झाल्यानंतर सोमवारी सकाळी ११ वाजता आरोपींना न्यायालयात हजर करण्याचे आदेश दिले होते. मात्र येरवडा कारागृह प्रशासन आणि पोलिसांकडून आरोपींना हजर करण्यात तासभर विलंब झाला. त्यामुळे न्यायालयाने कारागृह प्रशासनाला नोटीस बजावली. आरोपींना न्यायाधीश एल. एल. येनकर यांनी न्यायासनासमोर उभे करुन त्यांच्यावरील आरोपांचा सारांश सांगितला. सरकार व बचाव पक्षाचा अंतिम युक्तिवाद ऐकून उद्या (९ मे)आरोपींना शिक्षा सुनावण्यात येईल, असे न्यायाधीश येनकर यांनी स्पष्ट केले.
नयना पुजारी कामावरून घरी जात असताना रात्री खराडी बायपास येथे उभ्या होत्या. इंडिका कॅब चालक योगेश राऊत याने नयना यांना घरी सोडण्याच्या बहाण्याने मोटारीतून निर्जन भागातून घेऊन गेला. ३ मित्रांसह त्यांच्यावर तीनदा बलात्कार केला. नंतर खून करुन ओळख पटू नये म्हणून दगडाने चेहरा ठेचला. हा गुन्हा येरवडा पोलीस ठाण्यात ८आॅक्टोबर २००९ रोजी दाखल झाला.