राष्ट्रवादीचे कार्यकर्ते हिरमुसले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 4, 2018 05:27 AM2018-05-04T05:27:23+5:302018-05-04T05:27:23+5:30
विधान परिषदेवर निवडून द्यावयाच्या परभणी-हिंगोली स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघ आघाडीच्या जागा वाटपात काँग्रेसला सुटल्याने राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांचा चांगलाच हिरमोड झाला.
अभिमन्यू कांबळे
परभणी : विधान परिषदेवर निवडून द्यावयाच्या परभणी-हिंगोली स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघ आघाडीच्या जागा वाटपात काँग्रेसला सुटल्याने राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांचा चांगलाच हिरमोड झाला.
या मतदारसंघाचे नेतृत्व राष्ट्रवादीचे आ़ बाबाजानी दुर्राणी हे करीत आहेत़ राष्ट्रवादीने तीन दिवसांपूर्वी आ़ दुर्राणी यांना दुसऱ्यांदा निवडणुकीच्या आखाड्यात उतरविण्याच्या उद्देशाने एबी फॉर्मही दिला होता़ त्यानंतर आ़ दुर्राणी यांनी ३ मे रोजी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांच्या उपस्थितीत उमेदवारी अर्ज दाखल करणार असल्याचे जाहीर केले होते़ त्यानुसार गुरुवारी सकाळी १० वाजेपासूनच शहरातील राष्ट्रवादी भवन येथे परभणी व हिंगोली जिल्ह्यातील राष्ट्रवादीचे नगरसेवक, पदाधिकारी जमा झाले होते. पण सकाळी १०च्या सुमारास राष्ट्रवादीचे अध्यक्ष खा़ शरद पवार यांनी आघाडीतील जागा वाटपानुसार परभणीची जागा काँग्रेसला सोडली असून, तुम्ही उमेदवारी दाखल करू नका, असे आ़ दुर्राणी यांना सांगितले़ त्यानंतर दुर्राणी यांनी खा़ पवार यांना पक्षाने घेतलेला निर्णय आपणास मान्य असल्याचे सांगितले़
पक्षाच्या परभणी मनपातील १९ नगरसेवकांनी सामूहिक राजीनामे देण्याची तयारी चालविली़ काही जि़प़ सदस्यही सामूहिक राजीनाम्याची भाषा करू लागले़ वातावरण गरम झाले़ त्यानंतर आ़ दुर्राणी, आ़ मधुसूदन केंद्रे, आ़ विजय भांबळे यांनी कार्यकर्त्यांची समजूत काढली़
याच वेळी काँग्रेसचे उमेदवार सुरेश देशमुख व जिल्हाध्यक्ष सुरेश वरपूडकर हेही राष्ट्रवादी भवनमध्ये दाखल झाले़ त्यांनीही राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना सन्मानाची वागणूक दिली जाईल, असे सांगून त्यांच्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही, असे आश्वासन दिले़