माझे घर समजून राष्ट्रवादी कार्यकर्त्यांची टोपेंच्याच भावाच्या घरावर दगडफेक; लोणीकरांचा दावा
By ऑनलाइन लोकमत | Published: December 2, 2023 08:39 PM2023-12-02T20:39:00+5:302023-12-02T20:40:34+5:30
बिनविरोध निवडणूक होण्यासाठी जालना जिल्हा बँक निवडणुकीतील विचित्र युती केली खरी परंतू अध्यक्ष आणि उपाध्यक्ष निवडीवरून वेगळाच विरोध सुरु झाला आहे.
बिनविरोध निवडणूक होण्यासाठी जालना जिल्हा बँक निवडणुकीतील विचित्र युती केली खरी परंतू अध्यक्ष आणि उपाध्यक्ष निवडीवरून वेगळाच विरोध सुरु झाला आहे. माजी मंत्री राजेश टोपे यांच्या गाडीची काच फोडून शाईफेक करण्याचा प्रकार भाजपा नेते बबनराव लोणीकर यांच्या कार्यकर्त्यांनी केला होता. याचे पडसाद जालण्यात सायंकाळीही उमटले. परंतू, टोपे समर्थकांनी लोणीकरांचे घर समजून टोपेंच्या भावाच्या घरावरच दगडफेक केल्याचा प्रकार घडला आहे.
विचित्र युतीत राजेश टोपेंच्या कारच्या काचा फुटल्या, लोणीकर म्हणाले मी भरून देतो, पण...
सायंकाळी सहा साडेसहा वाजेच्या सुमारास माजी पालकमंत्री आमदार बबनराव लोणीकर यांच्या घरावर आमदार राजेश टोपे यांच्या कार्यकर्त्यांनी दगडफेक केल्याची बातमी संपूर्ण जिल्ह्याभरासह राज्यात पसरली. या चर्चेला उधाण आल्यामुळे तात्काळ पोलिसांनी घटनास्थळी येऊन परिस्थिती नियंत्रणात आणली. परंतू, काहीच वेळात स्वतः बबनराव लोणीकर यांनी पत्रकार परिषद घेत आपल्या घरावर नाही तर टोपेंच्याच भावाच्या घरावर दगडफेक झाल्याचे स्पष्ट केले.
माझ्या घरावर कुठल्याही प्रकारची दगडफेक झाली नसून माझे घर समजून त्यांनी राजेश टोपे यांचे बंधू सतीश टोपे यांच्या घरावरच दगडफेक केल्याचे लोणीकर यांनी स्पष्ट केले. तसेच राजेश टोपे यांना माझ्या घरावर दगडफेक करायला दहा जन्म घ्यावे लागतील, असा टोलाही लगावला.
राजेश टोपे यांचे बंधू सतीश टोपे व जालना जिल्ह्याचे माजी पालकमंत्री आमदार बबनराव लोणीकर यांच्या घरावर दगडफेक करण्यात आली होती. या दगडफेकीमुळे संपूर्ण शहरात भीतीचे वातावरण पसरले होते. त्यामुळे पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन संपूर्ण परिस्थिती नियंत्रणात आणली व त्या ठिकाणावरून सर्व नागरिकांना बाजूला करत परिस्थिती नियंत्रणात आणली असल्याची माहिती अप्पर पोलीस अधीक्षक यांनी दिली आहे.