आपण भानगडी करत बसलो तर...; पालकमंत्रिपदाच्या वादावरून आदिती तटकरेंचा गोगावलेंवर निशाणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 22, 2025 16:07 IST2025-01-22T16:04:38+5:302025-01-22T16:07:06+5:30

आदिती तटकरे यांनी प्रतिक्रिया देत भरत गोगावले यांच्यावर अप्रत्यक्षरीत्या निशाणा साधला आहे. 

ncp Aditi Tatkare targets bharat gogavale over the Guardian Ministership controversy | आपण भानगडी करत बसलो तर...; पालकमंत्रिपदाच्या वादावरून आदिती तटकरेंचा गोगावलेंवर निशाणा

आपण भानगडी करत बसलो तर...; पालकमंत्रिपदाच्या वादावरून आदिती तटकरेंचा गोगावलेंवर निशाणा

Aditi Tatkare: शिवसेना नेते आणि मंत्री भरत गोगावले यांच्या तीव्र विरोधानंतर रायगडच्या पालकमंत्री आदिती तटकरे यांच्या नियुक्तीला स्थगिती देण्यात आली. तसंच गोगावले आणि त्यांच्या समर्थकांनी उघडपणे नाराजी व्यक्त करत पालकमंत्रिपद आम्हालाच मिळायला हवे, अशी मागणी केली. या वादंगावर आदिती तटकरे यांनी प्रतिक्रिया देत भरत गोगावले यांच्यावर अप्रत्यक्षरीत्या निशाणा साधला आहे. 

"मागील सरकारमध्ये दोन वर्ष शिवसेनेचे पालकमंत्री असताना आम्ही एकही तक्रार केली नाही. त्यांनीही चांगल्या पद्धतीने जिल्हा सांभाळला. आता ५ वर्षांसाठी आपण सरकारमध्ये आलोय. मी मंत्री आहे, भरतशेठ गोगावले, उदय सामंत, योगेश कदम मंत्री आहेत. शेजारच्या जिल्ह्यात नितेश राणे मंत्री आहेत. कोकणाला पहिल्यांदाच पाच मंत्री मिळाले आहेत. त्यामुळे कोकण आपण विकासात्मकदृष्ट्या किती पुढे घेऊन जातो, हे माझ्या मते महत्त्वाचं आहे. आपण जर वाद घालत बसलो, भानगडी करत बसलो आणि लोकांपुढे हेच मुद्दे घेऊन गेलो तर लोकांना ते आवडत नाही. त्यामुळे अशा बाबींपासून आम्ही अलिप्त राहतो. आमची ती राजकीय संस्कृती नाही," असं तटकरे यांनी म्हटलं आहे.

"राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वावर आमचा विश्वास आहे. पालकमंत्रिपदासंदर्भात हे नेते जो निर्णय घेतील, तो आम्हाला मान्य असेल," अशी भूमिकाही आदिती तटकरेंनी मांडली आहे.

दरम्यान,रायगडच्या पालकमंत्रिपदावर शिंदेसेनेने दावा केला होता. रायगड जिल्ह्यात शिंदेसेनेचे तीन आणि भाजपचे तीन आमदार आहेत. शिंदेसेनेचे भरत गोगावले यांना रायगडचे पालकमंत्रिपद हवे होते, पण जिल्ह्यात अजित पवार गटाचा एकच आमदार असूनही पालकमंत्रिपद अदिती तटकरेंना देण्यात आले होते. त्याला शिंदेसेनेने आक्षेप घेतला होता. शिंदेसेनेला रायगडच्या पालकमंत्रिपदी भरत गोगावले यांची नियुक्ती करायची होती. रायगड जिल्ह्यात गोगावले यांचे भावी पालकमंत्री असे बॅनरही लागले होते, मात्र अदिती तटकरेंची नियुक्ती झाल्याने गोगावले यांनी दुसऱ्या कोणत्याही जिल्ह्याचे पालकमंत्रिपद स्वीकारण्यास नकार दिला होता. 

Web Title: ncp Aditi Tatkare targets bharat gogavale over the Guardian Ministership controversy

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.