इंधन दरवाढीविरोधात राष्ट्रवादी महिला आक्रमक, राज्यात आज 'चूल मांडा' आंदोलन!
By ऑनलाइन लोकमत | Published: February 28, 2021 08:34 AM2021-02-28T08:34:17+5:302021-02-28T10:47:10+5:30
NCP protests against petrol-diesel price hike : राष्ट्रवादी (NCP) महिला काँग्रेसतर्फे आज पेट्रोल दरवाढीविरोधात 'चूल मांडा' आंदोलन केला जाणार आहे.
मुंबई : गेल्या काही दिवसांपासून इंधनाच्या दरात सातत्याने वाढ होत आहे. या इंधनाच्या वाढत्या दरांचा फटका सामान्यांना सहन करावा लागत आहे. अगदी गाड्यांच्या वाहतुकीपासून ते घराच्या किरणा मालापर्यंत सर्वच क्षेत्रांवर दरवाढीचा परिणाम जाणवून येत आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी महिला काँग्रेसने केंद्रातील मोदी सरकारविरोधात आंदोलन पुकारले आहे. राष्ट्रवादी (NCP) महिला काँग्रेसतर्फे आज पेट्रोल दरवाढीविरोधात 'चूल मांडा' आंदोलन केला जाणार आहे. (NCP protest against the price increase of petrol-diesel and gas)
राष्ट्रवादी महिला काँग्रसेतर्फे राज्यभरात चूल मांडा आंदोलन केले जाणार आहे. आज सकाळी 11 वाजता या आंदोलनाची सुरुवात होईल. राज्यातील ज्या-ज्या पेट्रोल पंपावर पंतप्रधान नरेंद्र मोदींची जाहिरात असेल, त्या सर्व पेट्रोल पंपांवर राष्ट्रवादीतर्फे 'चूल मांडा' आंदोलन केले जाईल, असे राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्षा रुपालीताई चाकणकर यांनी सांगितले.
राज्यात ज्या-ज्या पेट्रोल पंपावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे बॅनर लावलेले असेल किंवा जाहिरात झळकत असेल, त्या-त्या पेट्रोल पंपावर राष्ट्रवादी महिला काँग्रेसतर्फे बॅनर किंवा फलकाखाली दगडाची किंवा विटांची चूल ठेवली जाईल. यावेळी आंदोलकांकडून गॅस सिलिंडरच्या वाढत्या किमतीच्या निषेधार्थ हे प्रतिकात्मक आंदोलन केले जाईल, असे रुपालीताई चाकणकर यांनी सांगितले. दरम्यान, राष्ट्रवादीच्या महिला कार्यकर्त्या तसेच सर्वसामान्य गृहिणी सोशल डिस्टन्सिंगचे नियम पाळून चूल मांडा आंदोलनात सहभागी होणार असल्याचे रुपालीताई चाकणकर यांनी सांगितले आहे.
(इंधन दरवाढीचा भडका! केवळ प्रवास नव्हे, जगणंही महाग; २३% इंधन महाग सोसणार कसे?)