“३ प्रश्नांची उत्तरे आधी द्या, एक दगड माराल तर आम्ही दोन मारु”; परांजपेंचा आव्हाडांवर पलटवार
By ऑनलाइन लोकमत | Published: December 2, 2023 05:04 PM2023-12-02T17:04:16+5:302023-12-02T17:04:44+5:30
Anand Paranjape Vs Jitendra Awhad: उपमुख्यमंत्री अजित पवार आणि कृषिमंत्री धनंजय मुंडेंवर बेछूट व बेलगाम आरोप करण्यापूर्वी याची उत्तरे द्या, असे जाहीर आव्हान आनंद परांजपेंनी जितेंद्र आव्हाडांना दिले.
Anand Paranjape Vs Jitendra Awhad: राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे चिंतन शिबिर झाले. यामधून पक्षाचे नेते छगन भुजबळ, प्रफुल्ल पटेल यांच्यासह अजित पवार यांनी सत्तेत सहभागी होणे, शरद पवार यांचा राजीनामा यांसह अनेक मुद्द्यांवर मोठे गौप्यस्फोट केले. तसेच अजित पवार यांनी आगामी लोकसभा निवडणुकीत कोणत्या जागांवर लढणार याबाबत काही स्पष्ट संकेत दिले. यावरून दोन्ही गटात आरोप-प्रत्यारोप होत आहेत. जितेंद्र आव्हाड यांनी केलेल्या टीकेला आनंद परांजपे यांनी उत्तर देताना, तुम्ही एक दगड माराल तर आम्ही दोन दगड मारू हे लक्षात ठेवा, असा इशारा दिला आहे.
शरद पवार यांनी पक्षाध्यक्षपदाचा राजीनामा दिला. तेव्हा राजीनामा मागे घ्यावा म्हणून सर्वप्रथम माझ्या नेतृत्वाखाली ठाण्यात, बॅलॉर्ड इस्टेट आणि यशवंतराव चव्हाण सेंटर येथे आंदोलन करण्यात आले होते. अजित पवार हे नेहमीच खरे बोलतात. यामुळे याबाबत अजितदादांनी जे सांगितले आहे ते सर्वस्वी खरेच आहे, असे आनंद परांजपे यांनी स्पष्ट केले. ते मीडियाशी बोलत होते. जितेंद्र आव्हाड यांनी केलेल्या आरोपांना उत्तर देताना, तीन प्रश्नांची उत्तरे आधी द्या, असे जाहीर आव्हान आनंद परांजपे यांनी केले.
बेछूट आरोप करण्याआधी तीन प्रश्नांची उत्तरे द्या
सुरज परमार आत्महत्या प्रकरणी कोणाच्या दरवाजावर डोके टेकवायला जात होतात. तत्कालीन अतिरिक्त पोलीस आयुक्तांकडे का गेला होतात, हे एकदा जाहीर करा. अनंत करमुसे यांना पोलीस संरक्षणात मारहाण करण्याचा बालिशपणा का केलात, आपणांस आपल्या घरी येऊन विनंती केली होती की, असे करु नका. तरीदेखील कॅबिनेट मंत्री असताना पोलिसांसमोरच अनंत करमुसे यांना बेदम मारहाण करुन बालिशपणा दाखविलात. पोलिसांचे करिअर बर्बाद केलेत याचे उत्तर द्या. वैभव कदम या आपल्या अंगरक्षकाच्या आत्महत्येस व त्यांच्या कुटुंबाचा आधार नष्ट करणाऱ्या गोष्टीस जबाबदार कोण, या तीन प्रश्नांची उत्तरे द्या, असे आव्हान आनंद परांजपे यांनी दिले.
दरम्यान, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि कृषिमंत्री धनंजय मुंडे यांच्यावर बेछूट व बेलगाम आरोप करण्याअगोदर आपणही काचेच्या घरात रहातो, आपण एक दगड माराल तर आम्ही दोन दगड मारु शकतो हे लक्षात ठेवा, असा इशारा आनंद परांजपे यांनी यावेळी आव्हाड यांना दिला.