“सुपुत्राच्या पराभवाचे चिंतन करा, पहाटे ५ पासून कामाला लागा”; कुणी केली राज ठाकरेंवर टीका?

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 30, 2025 19:36 IST2025-01-30T19:31:31+5:302025-01-30T19:36:23+5:30

NCP Ajit Pawar Group Amol Mitkari Replied Raj Thackeray: महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत अजित पवार गटाला मिळालेल्या जागांवर केलेल्या भाष्यावरून राज ठाकरेंवर आता पलटवार करण्यात येत आहे.

ncp ajit pawar group amol mitkari replied raj thackeray over criticism on party winning seats in maharashtra election 2024 | “सुपुत्राच्या पराभवाचे चिंतन करा, पहाटे ५ पासून कामाला लागा”; कुणी केली राज ठाकरेंवर टीका?

“सुपुत्राच्या पराभवाचे चिंतन करा, पहाटे ५ पासून कामाला लागा”; कुणी केली राज ठाकरेंवर टीका?

NCP Ajit Pawar Group Amol Mitkari Replied Raj Thackeray: विधानसभा निवडणूक निकाल लागल्यावर महाराष्ट्रभर सन्नाटा पसरला. लोकांनाच हा निर्णय कळला नाही, पचला नाही. माझ्याकडे संघ परिवाराशी संबंधित एक व्यक्ती आली होती, ते म्हणाले 'इतना सन्नाटा क्यो है भाई, कोई तो जिता होगा... कोणीतरी जिंकलं ना मग जल्लोष का नाही? काही काही गोष्टींवर विश्वासच बसू शकत नाही. भाजपाला १३२ जागा मिळाल्या, मागील वेळी १०५ मिळाल्या होत्या. २०१४ साली १२२ जागा होत्या. भाजपाचे समजू शकतो, पण अजित पवारांना ४२ जागा कुणाचा तरी विश्वास बसेल का? त्याशिवाय जे इतके वर्ष राजकारण करत आले, ज्यांच्या जीवावर हे लोक मोठे झाले त्या शरद पवारांना फक्त १० जागा मिळतात.  या सर्व न समजण्यासारख्या गोष्टी आहेत, असे राज ठाकरे यांनी म्हटले आहे. वरळी येथे मनसेचा राज्यस्तरीय मेळावा पार पडला. यावेळी ते बोलत होते. यावरून अजित पवार गटाच्या नेत्यांनी राज ठाकरेंवर पलटवार केला आहे. 

२०२४ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीचे निकाल अनेकार्थाने धक्कादायक होते. महायुतीला प्रचंड बहुमत मिळाले, तर महाविकास आघाडीला विरोधी पक्षनेते पदासाठी आवश्यक आकडा गाठणेही कठीण झाले. या निवडणुकीत राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचीही अधिक चर्चा होती. परंतु, मनसेची एकही जागा निवडून आली नाही. निवडणुकीनंतर अधिक समोर न आलेल्या राज ठाकरे यांनी आता आपली भूमिका मांडली आहे. निवडणूक प्रक्रियेवर संशय व्यक्त केल्यानंतर आता भाजपासह अजित पवार गटाचे नेते राज ठाकरेंवर टीका करत आहेत. अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अमोल मिटकरी यांनी राज ठाकरे यांना प्रत्युत्तर दिले आहे. 

सुपुत्राच्या पराभवाचे चिंतन करा, पहाटे ५ पासून कामाला लागा

राज ठाकरेंनी अजित पवार यांच्यासारखे पहाटे ५ वाजल्यापासून कामाला लागले पाहिजे. अजित पवार दिवसरात्र काबाडकष्ट करतात, मेहनत करतात त्यामुळे विधानसभेत त्यांना ४२ जागांपर्यंत मजल मारता आली. राज ठाकरेंना नेहमीच उशिरा उठून चिंतन करण्याची सवय आहे. त्यामुळे विधानसभेला स्वत:च्या घरात झालेल्या दारुण पराभवानंतर ४२ जागा कशा आल्या हा शॉक त्यांना दीड महिन्यांनी बसला.  राज ठाकरेंनी आपल्या सुपुत्राचा दारुण पराभव का झाला? आणि आपल्या जागा का निवडून आल्या नाहीत? यावर भाष्य करावे.  यासाठी त्यांनी पहाटे ५ वाजल्यापासून कामाला लागले पाहिजे, असा खोचक टोला अमोल मिटकरी यांनी राज ठाकरे यांना लगावला आहे. 

दरम्यान, विधानसभेत १२८ जागा लढवून शून्य जागा आणि फक्त १.५५ टक्के मते मिळालेल्या मनसे नेते राज ठाकरे यांनी पहिल्यांदा पक्ष आणि रेल्वे इंजिन हे चिन्ह वाचवण्यावर आत्मचिंतन करावे. मनसे कायम ऋतूप्रमाणे आपली भूमिका बदलणारा पक्ष दिसतो. गोंधळलेल्या अवस्थेमुळे महाराष्ट्रातील जनतेला राज ठाकरे यांच्या भूमिकेवर कधी विश्वास वाटला नाही. म्हणूनच मनसेला महाराष्ट्राच्या विधानसभेत प्रतिनिधीत्व मिळालेले नाही. महायुतीत राष्ट्रवादी काँग्रेसला ४१ जागा कशा मिळाल्या याच्यावर चिंतन करण्यापेक्षा आपला पक्ष कसा वाचेल, आपल्या पक्षात कार्यकर्ते, पदाधिकारी कसे टिकतील आणि महाराष्ट्रातील जनता आपली भूमिका स्वीकारेल का यावर राज यांनी आत्मचिंतन करावे. राज ठाकरे हे महाराष्ट्रातील मोठे नेते आहेत परंतु या महाराष्ट्राने त्यांची बदलणारी भूमिका बघितली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसला लोकसभेत जरी अपेक्षित यश मिळाले नाही तरी राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पुन्हा जनतेसमोर गेला. महाराष्ट्रातील जनतेशी नाळ जोडून लोकांचे प्रश्न समजून ते सोडवण्याचा प्रयत्न राष्ट्रवादी काँग्रेसने केला, असे सांगत अजित पवार गटाचे नेते आनंद परांजपे यांनी राज ठाकरेंवर टीका केली. 

 

Web Title: ncp ajit pawar group amol mitkari replied raj thackeray over criticism on party winning seats in maharashtra election 2024

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.